कदमवाकवस्तीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:36+5:302021-02-27T04:14:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती येथील वाकवस्ती जवळील अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती येथील वाकवस्ती जवळील अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत ही कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएने आतापर्यंतची केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. बेकायदा बांधकाम थांबविण्याची नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकापे पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
पीएमआरडीए'च्या कार्यक्षेत्रात झालेल्या बेकायदा बांधकामांना यापूर्वीच नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांमध्ये संबंधितांना बेकायदा बांधकाम थांबविण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, या नोटीसला प्रतिसाद न देता काही व्यावसायिकांनी बांधकाम सुरूच ठेवल्याने ‘पीएमआरडीए’च्या नोटिसीला केराची टोपली दाखवली होती. यामुळे थेट कारवाईचा बडगा उचलत ही अनधिकृत बांधकामे पाडण्याची माेहीम आता पीएमआरडीएने हाती घेतली आहे. पीएमआरडीए'चे आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली कारवाई करण्यात आली आहे.
चौकट
कारवाई सुडबुद्धीने
हवेली तालुक्यात शेकडो अनधिकृत बांधकामे आहेत. त्यावर कारवाई न करता केवळ कदमवाकवस्तीमध्येच कारवाई करण्यात आल्याने ही कारवाई काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून व सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असे येथील नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.