राज्याचा गाडा सुरळीत करण्यासाठी हातात हात : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:14 AM2018-11-27T01:14:50+5:302018-11-27T01:17:59+5:30

महापालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तळजाई टेकडीवर बांधलेल्या सदुभाऊ शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उद््घाटन सोमवारी सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाले.

Hand in hand to make the state: Sharad Pawar | राज्याचा गाडा सुरळीत करण्यासाठी हातात हात : शरद पवार

राज्याचा गाडा सुरळीत करण्यासाठी हातात हात : शरद पवार

Next

पुणे : राज्याचा गाडा सुरळीत करायचा असेल तर पृथ्वीराज चव्हाण काय, मी काय, आम्हाला हातात हात घालूनच काम करावे लागेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील आगामी राजकारणाचे संकेत दिले. कर्तृत्व महत्त्वाचे असते, ते असले की मी पक्ष वगैरे काही पाहत नाही, असेही ते म्हणाले.


महापालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तळजाई टेकडीवर बांधलेल्या सदुभाऊ शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उद््घाटन सोमवारी सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, सदानंद मोहोळ उपस्थित होते. राजकीय टीकाटिप्पणी करत पवार यांनी या वेळी जुन्या क्रिकेटपटूंची नावासह माहिती देत त्यांच्या क्रिक्रेटप्रेमाचे दर्शनही घडवले. महापालिकेला काही सूचनाही या वेळी केल्या.


पवार म्हणाले, पूर्वी भारतीय संघात मुंबईचेच चेहरे असायचे. आता झारखंडसारख्या राज्यातील खेळाडूही भारतीय संघात असतात. पुण्यातही दि. ब. देवधर तसेच आणखी अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. आता तसे दिसत नाही. याचे कारण मार्गदर्शन मिळत नाही. महापालिकेने शक्य झाले तर वेतन देऊन दोन प्रशिक्षक ठेवावेत व गरीब मुलांना प्रशिक्षण द्यावे. तर पुण्यातूनही अनेक खेळाडू भारतीय संघात दिसतील.


चव्हाण म्हणाले, की देशातील नगरपालिका, महापालिका यांनी आदर्श घ्यावा, असे हे स्टेडियम आहे. पवार यांचे क्रिकेटसाठीचे योगदान फार मोठे आहे. देशाच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली. बागुल यांनी काही वर्षांपूर्वी आराखडा दाखवला होता, त्या वेळी तो प्रत्यक्षात येईल का याची शंका होती, पण त्यांनी चिकाटीने ते शक्य करून दाखवले. ६ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर आता त्यांनी थोडे पुढे सरकावे व पवारांनी त्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा.


चंदू बोर्डे यांनी शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासारखा लेगस्पिनर व्हायचे होते; पण जमले नाही, असे ते म्हणाले. उल्हास पवार, आमदार विश्वजित कदम यांचीही या वेळी भाषणे झाली. बागुल यांनी प्रास्तविकात स्टेडियमला शिंदे यांचे नाव देऊन एका क्रिकेटपटूचे स्मारक करता आले याचा आनंद असल्याचे सांगितले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत केले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ व प्राजक्ता माळी यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक अविनाश बागवे यांनी आभार व्यक्त केले.

सदू शिंदे यांचा खेळ पाहता आला नाही, मात्र त्यांनीच माझी विकेट घेतली...
सदू शिंदे हे शरद पवार यांचे सासरे. त्यामुळे पवार व शिंदे यांच्या कुटुंबातील लहान-मोठे असे तब्बल ३२ जण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले; मात्र त्या आल्या नाहीत. पवार यांनीही त्यांना आग्रह करू नका, असे संयोजकांना सांगितले.
पवार यांनी भाषणात, ‘भाऊसाहेब निंबाळकर हे पृथ्वीराज चव्हाण यांचे काका प्रसिद्ध क्रिकेटपटू होते, त्यांनी ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला असता; पण प्रतिस्पर्धी संघाने खेळच सोडून दिल्यामुळे ती संधी हुकली’ असे सांगितले. पृथ्वीराज यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी यांनी महिला क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबाबतही त्यांनी सांगितले. पुण्यातील रंगा साठे, नाना जोशी, वसंत रांजणे या खेळाडूंची नावे त्यांनी घेतली. सदू शिंदे यांचा खेळ पाहता आला नाही; मात्र त्यांनीच माझी विकेट घेतली, अशी मिस्कील टिप्पणी त्यांनी केली.

पवारांची गुगली, चव्हाणांची सावध खेळी

तळजाई येथील सदू शिंदे क्रिक्रेटच्या मैदानाचे सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बॅटबॉल हातात घेऊनच उद्घाटन केले. नगरसेवक आबा बागुल यांनी त्यांना याचप्रकारे उद्घाटन करावे, असा आग्रह धरला. सुरुवातीला पवार नाही म्हणत होते, मात्र नंतर त्यांनी तयारी दर्शवली व चव्हाण यांना दोन गुगली टाकले. चव्हाण यांना ते खेळता आले नाहीत.
पवार यांनी चेंडू हातात घेतला त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. चव्हाण हेही बॅट हातात घेत थोड्या सावधपणेच यष्टींच्या पुढे उभे राहिले. क्षणभर थांबून पवार यांनी एक साधा चेंडू टाकला. चव्हाण यांना तो टोलवता आला नाही. त्यामुळे तो यष्टीच्या मागे गेला. पवार यांनी पुन्हा एक गुगली चव्हाण यांना टाकला; मात्र तोही चव्हाण यांच्या सावध खेळण्यामुळे यष्टींच्या मागे गेला. दोन चेंडूनंतर मात्र खेळ थांबवण्यात आला.
चंदू बोर्डे नंतर त्यावर आपल्या भाषणात म्हणाले, पवार यांचे राजकारण कसे गुगली असते ते मला आज समजले. विकेट ओली असेल तर कोणीही फलंदाजी घेत नाही. पवार यांनी सुरुवातीला घेतलेली फलंदाजी नंतर लगेचच चव्हाण यांच्या हातात बॅट देत नाकारली व गोलंदाजी घेतली. यावरून ते फक्त राजकारणीच नाही तर उत्कृष्ट क्रिकेटियर आहेत हेही दिसले.

Web Title: Hand in hand to make the state: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.