लग्न लागण्यापूर्वीच आरोपीच्या हातात बेड्या; पाच महिन्यापासून होता फरार...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:08 PM2022-06-14T20:08:19+5:302022-06-14T20:08:35+5:30

खुनाच्या प्रयत्नातील पाच महिन्यापासून फरारी असलेला आरोपी लग्न करण्यासाठी मंदिरात आला होता

Handcuffs in the hands of the accused before marriage He had been absconding for five months | लग्न लागण्यापूर्वीच आरोपीच्या हातात बेड्या; पाच महिन्यापासून होता फरार...

लग्न लागण्यापूर्वीच आरोपीच्या हातात बेड्या; पाच महिन्यापासून होता फरार...

Next

लोणी काळभोर : खुनाच्या प्रयत्नातील पाच महिन्यापासून फरारी असलेला आरोपी लग्न करण्यासाठी मंदिरात आला. परंतु लग्न लागण्यापूर्वीच त्याच्यासहित साथीदार अशा दोघांना लोणी काळभोरपोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी अमित बालाजी सोनवणे (वय २६) व अभिषेक संजय पवार (वय. २२, दोघेही रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी माळी मळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर येथे श्रीनिवास नानासाहेब जगताप (वय ३०, रा. माळीमळा, लोणी काळभोर) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. अमित सोनवणे, अभिषेक पवार व त्यांच्या १० ते १२ साथीदार दुचाकीवर आले. त्यांनी हातामध्ये लोखंडी कोयते फिरवून दहशत निर्माण करत फिर्यादी यांना जीवे मारण्याचे उद्देशाने लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते. 
            
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी ११ व १२ जून दरम्यान पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. फरारी आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार राजेश दराडे व बाजीराव वीर यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्हयातील ५ महिन्यापासून फरारी असलेला अमित सोनवणे हा थेऊर येथे महातारीआई मंदीरात प्रेमविवाह करण्याकरीता त्याच्या साथीदारांसह येणार आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजु महानोर आणि त्यांचे पथक सदर ठिकाणी वेषांतर करून जाऊन थांबले. नवरा नवरीच्या लग्न पोशाखात काही जण चारचाकीतून महातारी आईच्या मंदिराच्या आवारात आले. पोलीस पथकाची चाहुल लागल्याने लग्न पोशाखातील इसम व त्याचा साथीदार तेथून पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करुन अमित सोनवणे व अभिषेक पवार यांना थोडयाच अंतरावर पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली आहे.

Web Title: Handcuffs in the hands of the accused before marriage He had been absconding for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.