मूठभर देशद्रोही म्हणजे काश्मीर नव्हे, गैरसमज दूर व्हावेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:51 AM2019-02-19T01:51:27+5:302019-02-19T01:51:38+5:30
काश्मिरी विद्यार्थ्यांची भूमिका : गैरसमज दूर व्हावेत
पुणे : काश्मीरमधील मूठभर लोक भारतविरोधी कारवायांना पाठिंबा देत असले, तरी मूठभर लोक म्हणजे संपूर्ण काश्मीर नव्हे. जवळपास ९० टक्के काश्मिरी नागरिकांच्या मनात देशप्रेमाचीच भावना आहे. त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण होऊ नये, असे आवाहन जम्मू काश्मीरमधील तरुणांनी केले आहे. निर्दोष लोकांना मारहाण झाल्यास अतिरेक्यांचे बळ वाढेल, याकडे लक्ष वेधतानाच, महाराष्ट्रात कोणत्याही दहशतवादी कारवायांना थारा दिला जाणार नाही, असा निश्चयही तरुणांनी व्यक्त केला.
पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यामुळे एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे जयपूर, देहराडून, हरियाना अशा ठिकाणी गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये काश्मिरी तरुणांना मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोणत्याही गैरसमजातून सामाजिक सलोखा बिघडू नये आणि सुसंवाद साधला जावा, या उद्देशाने सरहद संस्थेतर्फे जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांच्या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी महाराष्ट्रातील नागरिकांचा मिळत असलेला पाठिंबा आणि शांततामय वातावरणाबद्दल तरुणांनी मनापासून आभार मानले.
या वेळी सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार उपस्थित होते. जाहीद भट, ओवेस वाणी, मुख्तार दार, अकिब भट, जावेद वाणी, एलियास खान, सिराज खान, आदिल मलिक आदी काश्मिरी तरुणांनी या वेळी उपस्थितांनी संवाद साधला. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली. आमच्याकडून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी शाश्वती देतानाच त्यांनी पुणेकरांचे आभार मानले. जम्मू-काश्मीरमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे संशयाने पाहिले गेल्यास अथवा विनाकारण त्रास दिला गेल्यास दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतात. उज्ज्वल भविष्य घडवू पाहणारे विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून विविध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जम्मूमधून काश्मिरींना हाकलण्यात आले, तर हरियाना, चंदीगडमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यास ते काश्मीरमध्ये परत जातील, त्यांच्या भविष्यावर या घटनांचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परस्परांमध्ये संवादाचे पूल प्रस्थापित झाले पाहिजेत. काश्मीरमधील तरुणांनीही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये, यासाठी आवाहन केले जात आहे. - जावेद वाणी
‘कनेक्टेड’ राहण्याची इच्छा
४जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना भारताशी ‘कनेक्टेड’ राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे सुसंवाद प्रस्थापित होऊन गैरसमज दूर व्हावेत आणि पुण्यासारखे सुरक्षित वातावरण सर्वत्र मिळावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.