पर्यावरणपूरक मूर्ती ६१ वर्षे बनविण्याचा हातखंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:42+5:302021-09-09T04:15:42+5:30
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. जुन्नर तालुक्यात ...
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. जुन्नर तालुक्यात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीचे जनक म्हणून ओळख निर्माण केलेले व वयाच्या ८३ व्या वर्षीही हाताने गणपती बनविण्याचा त्यांचा हातखंडा व उत्साह तरुणांनादेखील लाजवेल असाच आहे. जुन्नर येथील कुंभारवाड्यातील किसन सखाराम शिंदे हे या अवलियाचे नाव असून, गेली ६१ वर्षे ते फक्त पर्यावरणपूरक मूर्तीच बनवतात. आतून पोकळ फक्त अर्धा इंच जाडीची हाताने शाडूची बिगर साच्याची मूर्ती बनविण्याचे त्यांचे कसब अचंबित करणारे आहे. तीस वर्षांपूर्वी त्यांनी आठ फुटी उंचीचा भाई कोतवाल चौकातील मंडळाचा पैलवान वेशातील बनवलेला गणपती आजही लोकांच्या स्मरणात आहे. गणपतीला रंगदेखील पर्यावरणपूरक वापरून सुंदर, आकर्षक मूर्ती ते बनवतात. वयाच्या २२व्या वर्षापासून ते या मूर्ती बनवतात. मकरंद व शाम ही दोन मुले नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असल्याने पत्नी लिलाबाई यांच्या खंबीर साथीने त्यांनी एक छंद म्हणून ही कला जोपासली आहे. घरगुती मूर्तीबरोबरच मोजक्या सार्वजनिक मंडळांनादेखील ते मूर्ती देतात. जुन्नर येथील खालचा माळीवाडा सार्वजनिक मंडळाला गेली ४५ वर्ष ते मूर्ती देतात. या मंडळानेदेखील एकाचप्रकारची मूर्ती व एकच कारागीर म्हणून त्यांच्याकडून गेली ४५ वर्ष पर्यावरणपूरक मूर्ती बनवून घेत ती बसविण्याचा विक्रम केला असल्याचे या मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष भारतीताई यांचे पती देवराम मेहर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जुन्नर येथील रमेश ज्ञानेश्वर शिंदे हे गेली सात वर्ष फक्त पर्यावरणपूरक गणपती बनवतात.