ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा आली पाटीपेन्सिल!

By admin | Published: January 1, 2017 04:31 AM2017-01-01T04:31:01+5:302017-01-01T04:31:01+5:30

विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा

In the hands of the children of the sugar mills again came! | ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा आली पाटीपेन्सिल!

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा आली पाटीपेन्सिल!

Next

बारामती : ‘विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आजही लागू पडतात. येथील शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी आणि त्यांच्या शारदा निकेतनमधील शिक्षकांनी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा निरंतन वसा घेतला. मागील तीन वर्षापासून आलेल्या कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा उपक्रम या वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावणारा ठरला आहे.
बारामती तालुक्यात माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती हे साखर कारखाने आहेत. दर वर्षीच्या गळीत हंगामासाठी मोठ्या प्रमाणात बीड, उस्मानाबाद, नगर आदी भागातील ऊसतोडणी कामगार मुलाबाळांसह कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होतात. काही वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने साखरशाळा सुरू केल्या. आता या साखरशाळा अभावानेच दिसत आहेत. काही ठिकाणी त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून आलेला विद्यार्थी पुढे ऊसतोडणी कामगारच होणार का, असा प्रश्न निर्माण झाला.
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे, सर्वांना मोफत शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील सांगितले; परंतु अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. ऊसतोडणी कामगारांची मुले तर ऐन कडाक्याच्या थंडीत आई-वडिलांबरोबर कारखान्यांवर दाखल झालेली असतात. ‘साखरशाळा’ बंद झाल्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते ही बाब सुनंदा पवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्राचार्य सूर्यकांत मुंढे, समन्वयक प्रल्हाद जाधव, शिक्षक विजयसिंह घाडगे यांना शाळेपासून वंचित राहिलेल्या कामगारांच्या मुलांचा सर्व्हे थेट कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन करण्यास सांगितले. २०१४ पासून गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या कुटुंबांचा सर्व्हे केला जातो. त्यामुळे अर्धवट शाळा सोडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली.
मोफत शिक्षण दिले जाते. कामगारांची मुले शिक्षणासाठी येण्यासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांना ने-आण करण्यासाठी गाडीची सोय केली. शाळेतील मुले, मुली या विद्यार्थ्यांना सामावून घेतात. साधारणत: चार महिने ही सोय केली जाते, असे प्राचार्य सूर्यकांत मुंढे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

नव्या वर्षाचे आगळेवेगळे स्वागत...
या वर्षी १४ मुलांची सोय करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना नव्या वर्षाची भेट म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कपडे, खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. ऊसतोडणी कामगारांची मुले प्रोजेक्टरसह अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे खरोखरच ‘वंचितां’च्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचा केलेला प्रयोग नव्या पिढीला दिशादर्शक आहे.

Web Title: In the hands of the children of the sugar mills again came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.