‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 09:03 PM2018-10-30T21:03:13+5:302018-10-30T21:14:32+5:30
प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे.
अमोल अवचिते
पुणे: दिवाळीला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात केरसुणी लक्ष्मी म्हणून पुजण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आजदेखील घराघरात पाळली जाते. लोकांच्या घरामध्ये पुजली जाणारी लक्ष्मीची ज्या घरामध्ये निर्मिती होते ती घरं ऐन दिवाळीत आज देखील अंधारात असतात. त्यांच्या अठरा विश्व दारिद्रय हे पाचवीलाच पुजले आहे. कितीही कष्ट केले तरी मिळणारा मोबदला अल्पच. व्यापारी कवडीमोल भावाने केरसुणी विकत घेतात. यातून होणारी आर्थिक पिळवणूक उघड्या डोळांनी पाहावी लागते. महाराष्ट्रातील मातंग समाज झोपडपट्टीमधील मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राहून 'लक्ष्मी' म्हणजेच केरसुणी बांधण्याचे काम वर्षानुवर्षे करतोय.
दिवाळी सणामध्येच केरसुनी बनवण्याचा व्यवसाय चालतो. या कालावधीमध्ये दिवसाला ७० ते ८० केरसुण्या बांधल्या जातात. तसे पाहता एकूणच १० ते १५ दिवसांच्या या दरम्यान सुमारे एक हजार ते दीड हजार केरसुण्या बांधून होतात. यातून मिळणारा मोबदला मात्र किरको़ळच असतो. केरसुणी २५ ते ३० रुपयांना विकली जाते. तर आधुनिक झाडूची किंमत १०० रुपयांच्या घरात आहे. केरसुणीच्या या किंमतीला देखील ग्राहकाकडून मोलभाव केला जातो. त्या विक्रीतुन गरज भागवेल इतकासुध्दा आर्थिक लाभ होत नाही.याच पैशातून मुलाबाळांना नवीन कपडे,, घरातलं आजारपण, लोकांची देणी, असा प्रपंच हाकला जातो. यात दिवाळी सण सोडला तर इतर दिवशी घरातील महिला धुणीभांडी, पुरुष, लग्नसराईमध्ये वाजंत्र्याचे काम करतात. तरीदेखील परिस्थतीशी दोन हात सुरुच असतात.
बलुतेदारीमध्ये लक्ष्मी पूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान आहे तर लक्ष्मीची निर्मिती करणारे कसबी हात मात्र दारिद्रयाच्या अंधारात अजूनही चाचपडत आहेत. प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे. केरसुणीला देवत्व देणाऱ्याकडून तिला जन्माला घालणाऱ्याला माणसांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावण्याची आस आहे. आमच्या कुटुंबाना सुखाचे दिवस ‘लक्ष्मी’ने दाखवावे आता हेच मनापासून वाटतं.
......................
शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी दक्षिण भारतीय केरसुणी विक्रेते दिवाळीमुळे दिसून येतात. हे नागरिक मूळचे आंध्रप्रदेशातील असून 'येरुकुला' आणि कुचीकर या भटक्या जमातीचे आहेत. या समाजाचा केरसुणी बांधणे हा पिढीजात व्यवसाय आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, या राज्यातून स्थलांतर करतात.
.....................................
शिंदीच्या झाडापासून केरसूनी बनवीली जाते. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. पुणे (जुन्नर),औरंगाबाद (सोयगाव) आणि आंध्रप्रदेशातून प्रामुख्याने मालाचा पुरवठा होतो. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे काँक्रिट जंगल वाढलं. परिणामी शिंदीच्या झाडांचे ही प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालेले आहे. नवीन पिढी पिढीजात व्यवसाय करण्यास इच्छूक नाही. त्यामुळे कसबी कारागिरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय टिकेल का नाही याची शंका आहे.
.............................
शिक्षण नसल्याने सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती नसते. अंधश्रद्धा आणि आर्थिक कारणामुळे समाज नेहमीच विकासच्या मुख्य प्रवाहात मागे राहिला आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये जर या समाजाला टिकायचे असेल तर शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणायला हवे.
संजय कोळेकर
प्राध्यापक समाजशात्र विभाग ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे)
.....................
रोजणदारीवर जाण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय कधीही चांगला. कष्ट भरपूर आहेत. त्या बदल्यात मोबदला कमी मिळतो तरी हा व्यवसाय करत आहे. अजूनही मराठी घरांमध्ये लक्ष्मीला मानसन्मान आहे.
गुलाब आदमने ( व्यावसायिक, मांजरी )