‘नगर रचना’चे सहसंचालक हनुमंत नाझीरकर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:13 AM2021-03-16T04:13:23+5:302021-03-16T04:13:23+5:30
पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांना शासनाने तब्बल ९ ...
पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांना शासनाने तब्बल ९ महिन्यांनंतर निलंबित केले आहे. नगर विकास विभागाने नुकताच हा आदेश काढला आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या अमरावती विभागात हनुमंत नाझीरकर हे सध्या सहसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध २१ ऑगस्ट २०१९ रोजी उघड चौकशी करण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या उघड चौकशीत उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची अधिक संपत्ती आढळून आली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली नाझीरकर व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याची माहिती नगर विकास विभागाला १८ जून २०२० रोजीच्या पत्रान्वये कळिवले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेल्या अशा पत्रांची दखल घेऊन अन्य विभागाने त्याच्यावर ९० दिवसांच्या आत कारवाई करणे अपेक्षित असते. असे असतानाही नगर विकास विभागाने गेल्या ९ महिन्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाठविलेल्या पत्रावर काहीही कारवाई केली नाही. आता नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांनी १० मार्च रोजी हनुमंत नाझिरकर यांना निलंबित केले आहे. निलंबित काळात नाझीरकर यांना अमरावती मुख्यालय शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय सोडता येणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.