‘सब से उंंची प्रेमसगाई’ रंगली
By admin | Published: April 17, 2017 06:38 AM2017-04-17T06:38:21+5:302017-04-17T06:38:21+5:30
चिरंजीव पीठ आयोजित ज्ञानोत्सवाची सांगता पंडित राजू सवार आणि सहकारी यांनी सादर केलेल्या ‘सब से ऊंची प्रेमसगाई’ या भक्तिरचनांच्या कार्यक्रमाने झाली.
पिंपरी : चिरंजीव पीठ आयोजित ज्ञानोत्सवाची सांगता पंडित राजू सवार आणि सहकारी यांनी सादर केलेल्या ‘सब से ऊंची प्रेमसगाई’ या भक्तिरचनांच्या कार्यक्रमाने झाली. प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चिरंजीव पीठ आयोजित चौथा ज्ञानोत्सव १४ एप्रिलपासून सुरू झाला. यामध्ये संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच अन्य क्षेत्रांतील नामवंतांचे व्याख्यान झाले. शेवटच्या दिवशी रविवारी पंडित राजू सवार यांचे भक्तीवर आधारित रचनांचा भजनसंध्या हा कार्यक्रम झाला. सुरूवातीला त्यांनी संगीताची केवळ पूरक भूमिका असेल, पण शब्दांचे भाव महत्त्वाचे अशा आशयाची व्यक्तगान राग प्रकारातील रचना सादर केली. नंद के लाला या भक्तिरचनेस सुरूवातीलाच श्रोत्यांनी टाळ्यांची दाद दिली. तसेच सूर, ताल, तराणा, काव्य या चार गुणांचा संगम असलेली पुरूषोत्तमदास जलोटा यांची मूळ रचना सखी वाजे पैज पैजणी पं. सवार यांनी त्यांच्या स्वरात सादर केली.
ही रचना सादर करताना ईश्वराच्या भेटीसाठी आपण काय करणे अपेक्षित आहे. ईश्वर भेटीचा साक्षात्कार, अनुभूती घ्यायची असेल तर मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे, याचे उदाहरणासह दाखले त्यांनी दिले. ज्या ठिकाणी दिसते तेथे ईश्वराचा शोध घेणे सुलभ; पण ज्या ठिकाणी दिसत नाही, त्या ठिकाणी ईश्वराचा शोध घेणे महत्त्वाचे आहे, असे सांगून बिंदुवन निवासी यांची ‘कन्हैया तुम एक नजर देखना है’ ही रचना सादर केली.
ईश्वराने सर्वांना दोन डोळे दिले. दोन्ही डोळ्यांनी दिसते; मात्र दोन कान दिले, दोन्ही कानांनी एकच काही तरी ऐकता येते. आत्मचिंतन आणि ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्यास आणखी एक दृष्टी प्राप्त होते. त्याला नजर म्हटले जाते. ती ईश्वर साक्षात्काराची एक वेगळी नजर आहे, हे त्यांनी बिंंदू यांच्या भक्तिरचनेतील तिसऱ्या कडव्यातून सादर केले. भक्तिरचना सादर करत असताना, भक्तिगीतांच्या चालीवर दुसऱ्या गाण्यांचे बोल सादर केले, त्या वेळी श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करत जणूकाही त्यास साथसंगत दिली.
राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, या झोपडीत माझ्या ही संत तुकाराममहाराज यांची काव्यपंक्ती सादर करून परमेश्वर गोरगरीब, उपेक्षित यांच्यात शोधावा. सुख महालात नाही तर झोपडीत मिळते, असा त्याचा अर्थही त्यांनी विशद केला.
या कार्यक्रमात पंडित राजू सवार यांनी सादर केलेल्या भक्तिरचनांना जीवन भोपे (पखवाज), संतोष साळवे (तबला), चैतन्य कुलकर्णी (हार्मोनियम), विभास सवार (गिटार), शत्रुघ्न खंडेलवाल (टाळ) यांनी साथसंगत दिली. तर सुभाष जाधव, विष्णू जोशी, स्वानंद बुरसे, वरूण देव, ज्योती सवार, विशाखा विचारे, नेहा सवार यांनी कोरस दिला.(प्रतिनिधी)