'हॅप्पी बर्थ डे' अझीम प्रेमजी

By admin | Published: July 24, 2016 12:59 PM2016-07-24T12:59:27+5:302016-07-24T12:59:27+5:30

फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये अझीम प्रेमजी तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत.

'Happy Birthday' Azim Premji | 'हॅप्पी बर्थ डे' अझीम प्रेमजी

'हॅप्पी बर्थ डे' अझीम प्रेमजी

Next

 संजीव वेलणकर पुणे.

पुणे, दि. २४ - फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये अझीम प्रेमजी  तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. २४ जुलै १९४५ रोजी त्यांचा जन्म झाला. गेल्या चार दशकात त्यांनी विप्रो कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आणली. 
२००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. 'टाइम'ने २००४ मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले होते. त्यांच्या योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता हे सगळे लक्षात घेऊन २००५ मध्ये 'पद्मभूषण' आणि २०११ मध्ये 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानांनी गौरविले आहे.  
प्रेमजी यांचे आजोबा ब्रिटिशांच्या काळाज जागतिक स्तरावर तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत असत. त्यांची जपान, रंगून (ब्रह्मदेश) व अन्य ठिकाणी तांदूळ निर्मितीची कार्यालये होती. 'राइस किंग' असे त्यांना त्याकाळी म्हटले जाई. बॅरिस्टर मोहंमद अली जिना यांची या प्रेमजी खानदानाशी जवळची ओळख होती. त्यांनी प्रेमजी कुटुंबिरयांनी फाळणीनंतर पाकिस्तानात यावे, असा आग्रह धरला होता. 
परंतु, आपली जन्मभूमी कर्मभूमी भारतच आहे. भारत देशावरच आपले प्रेम आहे. याविषयी प्रेमजी कुटुंबियांच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. ते जिनांच्या दबावाला बळी पडले नाहीत. पाकिस्तानात गेले नाहीत. भारतात त्यांचा 'वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स' या नावाने वनस्पती तेल, तूप व साबण निर्मितीचा व्यवसाय होता. या कंपनीच्या आद्याक्षरापासून शब्द तयार झाला विप्रो. याच 'विप्रो' नावाने पुढे प्रेमजी यांनी १९६६ मध्ये कारभार हाती घेतल्यानंतर मोठा विस्तार केला. हवा कुणीकडे चालली आहे, जगात नवीन कोणते उद्योगधंदे पुढे येताहेत, कोणते तंत्रज्ञान पुढे येते आहे, यावर प्रेमजींचे लक्ष असे. म्हणूनच एकीकडे साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले. 
त्या-त्या क्षेत्रातील गुणी माणसे हेरून त्यांना आपल्या उद्योगसमूहात सामील करून उद्योग चौफेर विस्तारला. 'विप्रो प्लुइडपॉवर', 'विप्रो टेक्नॉलॉजिस', 'इन्फ्रास्ट्रक्चर', 'लायटिंग', 'इकोएनर्जी', 'मॉड्युलर फर्निचर' अशा अनेक कंपन्या काढल्या. माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले, हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात विप्रो इन्फोटेक, माइंडट्री, नेटक्रॅकर अशा कंपन्यांद्वारा कॉम्प्युटर आिलण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटवली. वैयक्तिक जीवनातही प्रेमजी यांना डामडौल, बडेजाव आवडत नाही. ते विमानाच्या 'इकॉनॉमी क्लास'ने प्रवास करतात. शाकाहारी जेवण त्यांना आवडते. 
त्यांच्या कंपनीच्या वा कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये सर्वांसाठी अन्न दिले जाते, तेच ते घेतात. कर्मचारी, कामगार यांच्याशी खुला संवाद करणे, त्यांना आवडते. बेंगळूरूमध्ये ते ऑफिसच्या दोन किलोमीटर अगोदारच गाडीमधून उतरून पायी चालत ऑफिसला जातात. बड्या, महागड्या हॉटेलात राहायला त्यांना आवडत नाही. जगातील सर्वांत महाग गाडी ते वापरू शकतात; पण त्यांची गाडी आहे 'टोयोटा कोरोला' ही. त्यांचे घरही साधेच आहे. कंपनीच्या कामकाजात वशिला, भ्रष्टाचार, खोटारडेपणा ते अजिबात खपवून घेत नाहीत. 
गुणवत्तेसंदर्भात भारतात '६-सिग्मा' ही प्रणाली त्यांनीच आणली, लागू केली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत मोलाचा मानला जाणारा 'पीसीएसएम लेव्हल -५' हे प्रमाणपत्र त्यांच्या कंपनीस मिळालेले आहे. कारभारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, सचोटी अशी 'विप्रो' उद्योगसमूहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील आणि दानशूरतेच्या बाबतीत तर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे. त्यांनी त्यांच्या मालकीचे अठरा टक्के शेअर्स समाज कार्यासाठी दान करण्याचे ठरविले. 
ही रक्कम शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाते. तिचा विनियोग अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी आणि खास करून शैक्षणिाक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीतून केला जाईल. त्यांचा हा निर्णय खरोखरच महत्त्वाचा आहे आणि देशातील धनिकांनी आवर्जून अनुकरण करावे, अशाच स्वरूपाचा आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या 'गिव्हिंग प्लेज' नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिले भारतीच उद्योजक आहेत. 
समाजोपयोगी उपक्रम आणि कार्य जवळपास सर्वच कंपन्या करीत असतात. त्यांना सीएसआर म्हणजे 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' या नावाने ओळखले जाते. त्याचा कायदाही आहे आणि त्यानुसार विशिष्ट टक्के रक्कम सीएसआरसाठी खर्च करावी लागते. असा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून प्रेमजी समाजासाठी मोठा निधी देत आहेत. शिक्षण हा त्यांचा स्वतःचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे प्रेमजी यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्युत अभिआंत्रिकी विषयाचे उच्च शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले होते. कोणालाही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहायला मिळू नये, असा त्यांचा ध्यास आहे. 
 

Web Title: 'Happy Birthday' Azim Premji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.