मार्केट यार्डात पुन्हा वाढदिवसानिमित्त धडामधूम...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 08:46 PM2019-12-25T20:46:56+5:302019-12-25T20:53:15+5:30
चक्क फटाक्यांची माळ लावली..
पुणे : मार्केट यार्डात पडलेला फळे, भाजीपाल्याचा कचरा, लाकडी फळ्या , पेढा असा सुका कचरा मोठ्या प्रमाणात असताना बाजार घटकांची सुरक्षा धाब्यावर बसवत आडत्यांकडून नियमित वाढदिवसानिमित्त फटाके वाजविण्याचे प्रकार होत आहेत. बुधावरी देखील अशा एका वाढदिवसानिमित्त फळ विभागात ११.१५ च्या सुमारस एका गाळ्यासमोर चक्क फटाक्यांची माळ लावून धडामधूम... करण्यात आले. बंदी असताना आडत्यांकडून मात्र नियमितपणे वाढदिवसांच्या आनंदोत्सव साजरा केला जात आहे. बाजार समिती प्रशासनाकडून देखील अशा लोकांवर कडक करवाई करणे टाळले जात असल्याची चर्चा बुधवारी सुरु होती.
बाजार समिती आवारातील गाळे हे शेतीमाल व्यापारासाठी आहेत. दररोज येथे व्यापारासाठी शेतीमालाची मोठी अवक होत असते. त्यामुळे येथे स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिगत कार्यक्रमास बंदी घातली आहे व्यापाऱ्यांनी ज्वालाग्राही पदार्थ बाळगायचे नाहीत, असाही नियम आहे. बाजार आवारात काही दिवसापूर्वी प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये फटाके वाजविले होते. त्यानंतर आत्ता गाळ्यावर फटाक्यांची माळच लावली होती. बाजार समिती २७ डिसेंबर नवीन नियम बाजारात लागू करत आहे. या नियमानुसार बाजार आवारात खासगी व्यक्ती आणि शेतीमालाची खरेदी-विक्री करण्याव्यतिरिक्त येणाऱ्या वाहनाना प्रवेशास बंदी घातली आहे तसेच गळ्यापासून पुढे १५ फुटापर्यंत माल विकण्यास परवानगी दिली आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्याला पाच हजार रुपये आणि जीएसटी दंड म्हणून आकारणार आहे. बुधवारी नियमाचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाजार घटक नियमांचे पालन करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान संबंधित व्यापाºयाला याबाबत नोटीस बजावली असल्याची माहिती फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली. आपली अनुज्ञप्ती लायसन रद्द का करू नये, याबाबत सात दिवसात खुलासा द्यावा, असे या नोटिशीत म्हटले असल्याचे बिबवे यांनी सांगितले.