हॅप्पी बर्थ डे..जग्गू..! केक कापत बैलाचा वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:12 PM2019-02-08T16:12:09+5:302019-02-08T16:13:55+5:30
अगदी घरातल्या छोट्या मुलाप्रमाणे जग्गुला जन्मदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून वाढदिवसाचा केक कापत समाजाला एक नवीन संदेश दिला.
वाकी बुद्रुक:- धावपळीच्या जगात खरंतर नातेवाईक, मित्र, आणि माणसांचे वाढदिवस विसरले जातात.पण ग्रामीण भागात अजूनही माणसांसह प्राणीमात्रांचे काळजीपूर्वक पध्दतीने पालनपोषण केले जाते. त्याचाच अनुभव देणारी ही घटना एकीकडे कुतुहल आणि दुसरीकडे कौतुकाचा विषय ठरत आहे.
खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक या गावातील शेतकरी टोपे कुटुंब.. त्यामुळे आपसुकच जनावरांशी जोडलं गेलेलं रक्ताचे नाते.. हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या शेतात राबणाऱ्या बैलावर पोटच्या पोराप्रमाणे जीवापाड प्रेम करतात. त्या बैलाचे नाव जग्गू. जग्गूचा वाढदिवस असताना तरी मग हे कुटुंब दुजाभाव आपल्या कसा करेल..टोपे यांनी आपल्या कुटुंबासह जग्गूचा वाढदिवस केक कापून मोठ्या दिमाखात साजरा केला. वाकी बुद्रुक येथील टोपे परिवाराने असा नवीन संदेश समाजात रुजवला आहे. अगदी घरातल्या छोट्या मुलाप्रमाणे जग्गुला जन्मदिवसाच्या दिवशी ओवाळणी करून वाढदिवसाचा केक कापत समाजाला एक नवीन संदेश दिला. या पुढील काळात देखील जग्गुचा प्रत्येक वाढदिवस आम्ही अशाच पद्धतीने साजरा करणार असल्याचे देखील शेतकरी भगवंत टोपे यांनी सांगितले.