‘पिफ’मधील चित्रपट निवडीवर रसिक खूष...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:04 AM2019-01-15T00:04:05+5:302019-01-15T00:04:19+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : दर्जेदार कलाकृतींचा समावेश

Happy choice for 'Pip' movie ... | ‘पिफ’मधील चित्रपट निवडीवर रसिक खूष...

‘पिफ’मधील चित्रपट निवडीवर रसिक खूष...

Next

पुणे : कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यश हे केवळ रसिकांच्या संख्येवर अवलंबून नसते, तर देशविदेशातील दर्जेदार चित्रपटांची तज्ज्ञ समितीकडून महोत्सवासाठी केली जाणारी निवड आणि त्या चित्रपटांना रसिकांची मिळालेली पसंती यावर महोत्सवाच्या यशापयशाची समीकरणे ठरत असतात. यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजतोय तो महोत्सवातील एक से बढकर अशा दर्जेदार कलाकृतींमुळे. ‘अरे तू हा चित्रपट पाहिलास का? नाही, अरे मग तू खरचं एक चांगला चित्रपट ‘मिस’ केलायस, नसशील पाहिलास तर आवर्जून पाहा, परत त्याचा शो आहे,’ अशा चर्चा ‘पिफ’मध्ये रंगल्या आहेत. युवा पिढीपासून ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींनीदेखील चित्रपटांना गर्दी करून ‘रसिकत्वा’ची पावती दिली आहे.


पुण्यात आठवडाभर रंगणारा ‘पिफ’ महोत्सव दर वर्षी विविध कारणांमुळे प्रकाशझोतात राहतो. ढिसाळ नियोजन हे त्यातील प्रमुख कारण असते. यंदाचा महोत्सवही त्याला काहीसा अपवाद ठरलेला नसला, तरी नाराजीच्या सुरापेक्षाही महोत्सवात चित्रपटांच्या दर्जाबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या रसिकांनी चित्रपट निवडीवर काहीशी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, ‘पिफ’मधील चित्रपट निवडीवर रसिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. वलर््ड सिनेमा, ग्लोबल सिनेमा, रिस्ट्रोपेक्टिव्ह, ट्रिब्यूट आणि मराठी स्पर्धात्मक विभागासाठी ज्या-ज्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे, त्या सर्व देशविदेशातील चित्रपटांवर रसिकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. चार दिवसांपासून रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

महोत्सवातील चित्रपट निवडीविषयी रसिकांशी संवाद साधला असता यंदाच्या महोत्सवातील प्रत्येक चित्रपट आवर्जून पाहावा असाच आहे.
४कुठेही चित्रपट भरकटला आहे किंवा कंटाळवाणा झाला आहे, असे कधीच वाटले नाही. उलट, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरत आहेत. मानवी सबंध, त्या-त्या देशांचा सामाजिक, राजकीय संघर्ष अशा विषयांवर आधारित चित्रपट अधिकतर निवडण्यात आले आहेत, ज्याच्याशी सहजपणे रिलेट होता येत असल्याचे प्रेक्षकांकडून सांगण्यात आले.

यंदाच्या चित्रपटांची निवड आवडली...
’पिफ’साठी आलेल्या १,७०० चित्रपटांना जगभरातून मान्यता मिळालेली असते. काही प्रायोगिक तत्त्वावर केलेले, मानवी संबंध, त्या-त्या देशातील प्रश्न किंवा चित्रपटांचे जे तांत्रिक आधुनिकीकरण आहे त्यातून नक्की काय साधले आहे त्याबद्दल भाष्य करणारे चित्रपट असोत अथवा नवीन लोकांनी वेगळ्या मांडणीतून नवीन विषयाला स्पर्श केलेले चित्रपट असोत हे सर्व ’पिफ’मधील चित्रपट निवडीमागचे निकष असतात. यंदाच्या महोत्सवातील चित्रपटांची निवड आवडली असल्याचे रसिक आवर्जून सांगत आहेत.
- डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष, पिफ

Web Title: Happy choice for 'Pip' movie ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा