सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’
By admin | Published: February 15, 2015 12:04 AM2015-02-15T00:04:18+5:302015-02-15T00:04:18+5:30
सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे.
पुणे : मैत्रीण, मुलगी, बहीण, पत्नी, आई, सासू... अशा विविध नात्यांची गुंफण घालत पुरूषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे. लोकमत सखी मंच आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या (अमरीश जैैन ग्रुप) वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका नात्यांमधील अतुट बंध मनोरंजनातून सखींसमोर उलगडतील. चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये शिवाजी उदय मंडळाच्या प्रांगणात शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम रंगणार आहे. कुटूंबातील प्रत्येकाच्या सुखासाठी झटणारी स्त्री समाजातही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मान-सन्मान मिळविते. अनेक नातेसंबंध जपत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करते. कुटूंबासह समाजातील विविध जबाबदाऱ्या लीलया पार पाडत यशाचे शिखर गाठते. या सखींचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमत सखी मंचने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘जल्लोष २०१५’ हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून थोडीशी उसंत काढत त्यांना मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकमत सखी मंचच्या सभासदांना या मैफलीत सहभागी होता येईल.
स्त्रीयांच्या जीवनातील विविध टप्पे, त्यांनी मिळविलेले यश, विविध नातेसंबंध जपताना करावी लागणारी तारेवरची कसरत... असे सारे काही गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून मनोरंजकरीत्या या कार्यक्रमातून उलगडताना सखींना अनुभवता येईल. मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या या अनोख्या मैफलीने कार्यक्रमात धम्माल येणार आहे. हिंदी गाणी, शेतकरी नृत्य, लावणी आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचा नजराणा या मैफलीत असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सखींमधूल लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यातील भाग्यवान विजेत्यांना सोने व चांदी जिंकण्याची संधी मिळेल. त्यामध्ये प्रथम बक्षीस १ लाखाचे सोने, द्वितीय बक्षीस ७५ हजार रुपयांचे सोने, तृतीय बक्षीस ५० हजार रुपयांचे सोने आणि उत्तेजनार्थ २५ हजार रुपयांची तीन चांदीची बक्षिसे असतील. तसेच उपस्थितांमधून विशेष लकी ड्रॉही काढला जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनाबरोबर सोन्या- चांदीची लयलुट करण्याची सुवर्णसंधी सखींसाठी अनोखी भेट असणार आहे.