Pune Rain Update: खेड तालुक्यातील बळीराजाला आनंदाचे दिवस; पश्चिम भागातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:27 PM2022-07-11T17:27:03+5:302022-07-11T17:27:13+5:30
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील १.५ टी.एम.सी असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन धरणातुन आरळा नदीत सांडव्यातून ५०१ क्युसेस प्रतिसेकंद या वेगाने पाणी वाहू लागले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चासकमान धरणाच्या वरच्या बाजूस आरळा नदीवर कळमोडी धरण आहे. या धरणामध्ये ४२ .८७ दशलक्ष घनमीटर म्हणजे दीड टीएमसी पाणी साठा होतो. धरणाला दरवाजे नाहीत. कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपुड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यास मोठी मदत झाली आहे. कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे खालच्या भागात असलेल्या चासकमान धरणामधील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चासकमान धरण २७ टक्के भरले होते. कळमोडी धरण क्षेत्रात आतापर्यंत ५५२ मिमी. पाऊस पडला आहे. गतवर्षी कळमोडी धरण १२ ऑगस्टला भरले होते. या वर्षी एक महिना आगोदर भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानी दिली आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे.