पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता
By अजित घस्ते | Published: October 12, 2023 03:45 PM2023-10-12T15:45:58+5:302023-10-12T15:47:03+5:30
पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) आणि बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता. त्यानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर करावा, अशी मागणी विविध इंटकसह अन्य कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस देण्याचा प्रस्ताव पीएमपीचे ठेवण्यात आला आणि त्याला मान्यता देण्यात आली. त्यानुसार मूळ वेतन तसेच महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के याप्रमाणे अनुदान व २१ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. बोनस रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्यात येणार आहे.
प्रवासीभिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी
पीएमपीएमएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या ३ महिन्यांत जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ होवून प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही प्रवाशांना प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी सांघिक प्रयत्न करतील. त्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. - सचिन्द्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक