आनंदी जीवनशैलीने मधुमेहमुक्ती शक्य
By Admin | Published: March 5, 2016 12:35 AM2016-03-05T00:35:25+5:302016-03-05T00:35:25+5:30
‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो
चिंचवड : ‘‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. रवी आचार्य यांनी केले.
शाहूनगर, चिंचवड येथील शिवशंभो फाउंडेशनच्या शिवशंभो व्याख्यानमालेत ‘मधुमेहमुक्त भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी उमा खापरे, योगेश बाबर, भगवान पठारे, लक्ष्मण टक्केकर, संजय मंगुडकर, भावेन पाठक, प्रदीप साळुंखे, संजय तोरखडे उपस्थित होते.
डॉ. आचार्य म्हणाले, ‘‘जागतिक मधुमेह दिनी १९९०मध्ये भारतात चार टक्के मधुमेही रुग्ण होते; गेल्या वर्षी हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जागतिकीकरणामुळे अनेक उपभोग्य वस्तूंची रेलचेल वाढली. जीवनशैलीत खूप मोठे बदल झाले. रात्री उशिरा पिझ्झा आणि शीतपेये असा आहार तरुण पिढी घेऊ लागली. कामातील प्रचंड ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेही तरुणांचा देश अशी भारताची ओळख निर्माण होईल की काय, अशी भीती आहे.
मधुमेहाची कारणमीमांसा केल्यावर अनुवंशिकता, आहारातील अनियमितता, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि जन्मजात मधुमेह ही मुख्य कारणे आढळतात. ड आणि ब-१२ जीवनसत्त्वाअभावी अशक्तपणा, थकवा जाणवतो आणि तीच मधुमेहाच्या संकटाची नांदी असते. ‘ड’ जीवनसत्त्वासाठी कोवळा सूर्यप्रकाश लाभदायक असतो. पहिल्या प्रहरी म्हणजेच पहाटे पाच ते सात दरम्यान किमान अर्धा तास पायी चालणे, १५ मिनिटे प्राणायाम, १५ मिनिटे सूर्यनमस्कार, अर्धा तास योगासने करावीत. आहाराच्या वेळा पाळाव्यात, असे ते म्हणाले.
केशव घोळवे यांनी मनोगत व्यक्त केले. अजित भालेराव, राजेश हजारे, सुधीर झाडबुके, नलिनी इंगळकर, जनार्दन लोंढे, प्रकाश येवले, कैलाश पोखरकर यांनी संयोजन केले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन
केले. रेणुका हजारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)