Happy New Year 2024: मंदिरांत रांगा; पर्यटनस्थळी धडाधड सेल्फी, हॉटेलमध्ये जेवणावरही ताव!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:02 AM2024-01-02T10:02:15+5:302024-01-02T10:02:37+5:30
अनेकांनी सहकुटुंब ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन, सेल्फी काढून नववर्ष साजरे केले...
पुणे : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे नवीन वर्षाचा सूर्योदय होण्यापूर्वीच शहरातील मंदिरांमध्ये पुणेकरांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरे आणि पर्यटनस्थळे ‘हाऊसफुल्ल’ झाली होती. अनेकांनी सहकुटुंब ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन, सेल्फी काढून नववर्ष साजरे केले.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे, याचे नियोजन प्रत्येकानेच केलेले असते. त्यानुसार कोणी व्यायाम सुरू केला, तर कोणी स्वतःसाठी वेळ द्यावा, असा संकल्प केला. प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने करतात. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी मध्य भागातील शिवाजी रस्ता, अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा रस्ता, गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. सोमवारी सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. भाविकांनी त्यांच्या मोटारी रस्त्यावर बेशिस्तपणे लावल्या हाेत्या. दुचाकी गल्लीबोळात लावल्याने वाहनांना वाट काढणे अवघड झाले होते. ग्रामदैवत कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, सारसबाग श्री सिद्धिविनायक, श्री महालक्ष्मी मंदिर, बुधवार पेठेतील श्री दत्त मंदिर,श्री अक्कलकोट स्वामी मंदिर, श्री ओंकारेश्वर, श्री जंगली महाराज मंदिर, श्री शंकरमहाराज समाधी मंदिर येथे सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती.
त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. याशिवाय, पुणेकरांचा अभिमान असलेल्या शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, शौर्य दिनानिमित्त राज्यभरातून नागरिक कोरेगाव भीमा येथे अभिवादनासाठी येतात. यावेळी या अनुयायांचीदेखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दीमुळे शनिवारवाड्याचा परिसर फुलून गेला. अनेकांना सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. नागरिकांच्या तिकिटांसाठीदेखील मोठ्या रांगा लागल्या रांगल्याचे चित्र पाहायला मिळाले.