सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला, अक्षता पडल्या आणि काही वेळातच तिची प्राणज्योत मावळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 10:09 PM2018-05-06T22:09:43+5:302018-05-06T22:09:43+5:30
जिवाला चटका लावून जाणारी एक घटना जिवाला चटका लावून जाणारी एक घटना
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील म्हसे येथे जिवाला चटका लावून जाणारी एक घटना घडली. डोक्यावर अक्षता पडल्या, लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत त्या जोडप्याने एकमेकांना मिठाईचे घास भरवत सर्व जण आनंदाने परतीला निघाले... दरम्यान, वधूला मंडपातच त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र सुखी संसाराचा अर्ध्यावरच डाव मोडला. उपचारापूर्वीच तिचे निधन झाले. जयश्री हिरामण मुसळे (वय १९) असे या नवविवाहितेचे नाव आहे. वधू-वरांच्या कुटुंबासह नातेवाईकावर दु:खाचे संकट कोसळले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी : शिरूर तालुक्यातील म्हसे येथील सोसायटीचे माजी चेअरमन बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामण व दिगंबर या दोन मुलांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सख्ख्या मावसबहिणी असलेल्या जयश्री शिवनिगप्पा कळसगोंडा व विजय लक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी यांच्याबरोबर ठरला होता. रविवारी थाटामाटात म्हसे येथे दुपारी बारा वाजता विवाह सोहळा उत्साहात झाला. जयश्री हिचा विवाह हिरामण यांच्यासोबत झाला. लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहत, या जोडप्याने एकमेकांना मिठाईचे घासही भरवले. अक्कलकोटवरून आलेल्या आई-वडील व पाहुणे आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले. त्यानंतर अचानक जयश्रीला ताप, चक्कर येऊन त्रास होऊ लागला. सासरे बबन मुसळे व ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरूरला दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र जयश्रीची प्राणज्योत त्यापूर्वीच मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया जयश्रीच्या देवाघरी जाण्याने हिरामणचे स्वप्नही संपले.