जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील हापूसला मिळणार ‘शिवनेरी हापूस‘ म्हणून नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:51+5:302021-07-30T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूस प्रमाणेच आता जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील हापूस आंब्याला देखील जागतिक दर्जाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूस प्रमाणेच आता जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील हापूस आंब्याला देखील जागतिक दर्जाचे ‘शिवनेरी हापूस‘ हे भौगालिक चिन्हांकन (पेटंट) मिळणार आहे. हे पेटंट मिळण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल २६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
जिल्ह्यात एक वर्षापूर्वी आलेल्या चक्रीवादळात जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील फळबाग पिकांना प्रचंड मोठा फटका बसला होता. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर तालुक्याचा दौरा करून फळबागांच्या नुकसानाची पहाणी केली. या वेळी जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आंबा उत्पादक अभिमन्यू काळे व इतर शेतकऱ्यांनी जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील हापूस आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. या वेळी पवार यांनी या मागणीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी यांना शिवनेरी हापूस मानांकनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी यासाठी २६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
फोटो- शिवनेरी हापूस