हर हर महादेव, जय मल्हार...! महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 04:02 PM2024-03-08T16:02:20+5:302024-03-08T16:03:34+5:30

हर हर महादेव आणि सदानंदाचा जयघोष करीत भाविक भंडार खोबऱ्याची उधळण करीत रांगेने शिवरात्रीचा पुण्यकाल साजरा करीत होते...

Har Har Mahadev, Jai Malhar...! A large crowd of devotees in Jejuri on the occasion of Mahashivratri | हर हर महादेव, जय मल्हार...! महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी

हर हर महादेव, जय मल्हार...! महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी

जेजुरी (पुणे) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी ( दि.८) पहाटेच्या सुमारास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच स्वयंभू शिवलिंग आणि पाताल लिंग भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले. हर हर महादेव आणि सदानंदाचा जयघोष करीत भाविक भंडार खोबऱ्याची उधळण करीत रांगेने शिवरात्रीचा पुण्यकाल साजरा करीत होते. 

महाशिवरात्री निमित्त तिर्थक्षेत्र जेजुरी गडावर गाभाऱ्यातील मुख्य स्वयंभू शिवलिंग, मंदिराच्या कळसातील शिखरलिंग (स्वर्गलोक ) आणि गाभाऱ्यातील उजव्या कोपऱ्यातील गुप्त लिंग (पाताळ लोक) अशी तिन्ही शिवलिंग देवदर्शनासाठी खुली केली जात असतात. वर्षातून फक्त महाशिवरात्रीलाच हा योग येत असल्याने राज्यभरातील भाविक रात्रीपासूनच रांगा लावून थांबलेले असतात.

काल रात्री १२ नंतर शिखरलिंग, गुप्तलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य स्वयंभू लिंग उघडण्यात आले. मार्तंड देवसंस्थांनचे प्रमुख विश्वस्त अनिल सौन्दडे, विश्वस्त मंगेश घोणे, अड् पांडुरंग थोरवे, अड् विश्वास पानसे, अभिजित देवकाते, डॉ.राजेंद्र खेडेकर तसेच खंडोबा देवाचे पुजारी सेवक, मानकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत लिंगाना महाभिषेक महाआरती करण्यात आली. यानंतर ही तीनही लिंगांपैकी शिखरलिंग वगळता गाभाऱ्यातील स्वयंभू व गुप्त लिंग भविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्याअंतर्गत शिखराचे काम चालू असल्याने शिखरलिंग दर्शनासाठी खुले ठेवलेले नाही.

दिवसभरात देवदर्शनासाठी भाविकांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. एक लाखांवर भाविकांनी देवदर्शन घेतले. भंडारा खोबऱ्याची उधळन, सदानंदाचा येळकोट, हर -हर महादेव च्या गजराने मल्हारगड दुमदुमून गेला होता. जेजुरीच्या खंडेरायाच्या जत्रा-यात्रा उत्सवांमध्ये महाशिवरात्रीउत्सवाला विशेष महत्व आहे. शनिवारी (दि. ९)  रात्री १० वाजेपर्यंत  मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार आहेत. देवसंस्थानच्या वतीने गडकोट मुख्य मंदिराला विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Web Title: Har Har Mahadev, Jai Malhar...! A large crowd of devotees in Jejuri on the occasion of Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.