हर हर महादेव! महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी गजबजणाऱ्या भीमाशंकरला यंदा कोरोनामुळे शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:42 PM2021-03-11T13:42:34+5:302021-03-11T13:54:45+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते पूजा
भिमाशंकर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे १० ते १२ मार्च दरम्यान संचारबंदी असल्याने महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीत अत्यंत उत्साही वातावरणात रात्री बारापासून गर्दी होते. यंदा मात्र सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
भीमाशंकर येथे गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि त्यांच्या ;पत्नी यांच्या हस्ते महादेवाची शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.सुरेश कौदरे, उपाध्यक्ष ॲड.विकास ढगे पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांभाते, देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, संजय गवांदे, आदेश कोडिलकर, पुरूषोत्तम गवांदे, आशिष कोडिलकर आदी उपस्थित होते. मंदिरात उपस्थितांच्या समवेत वेदपठणही करण्यात आले.
दरवर्षी शासकीय पूजेनंतर खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीची यात्रा सुरू होते. मात्र, यंदा पूजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांग लागते. तसेच दरवर्षी फुले, फळे, प्रसाद, पेढा व इतर खाद्य पदार्थांंनी भरलेली दुकाने बहरलेली असतात.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळेच चित्र दिसून आले. दर्शनरांगेत शुकशुकाट होता. मंचर ते भीमाशंकर व खेड ते भीमाशंकर दरम्यान ठिकठिकाणी चेकनाके लावण्यात आले होते. तसेच भीमाशंकर कडे जाणाऱ्या गाडया अडवून परत पाठवल्या जात होत्या. प्रशासनाने यापूर्वीच भीमाशंकर यात्रा होणार नसल्याचे जाहीर केल्याने रस्त्याने वाहनांची गर्दी फारसी दिसत नव्हती.