Shravan Somvar: हर हर महादेव...! श्रावण सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 03:39 PM2024-08-05T15:39:19+5:302024-08-05T15:41:26+5:30

भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत भाविकांनी पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले

Har Har Mahadev Shravan somvar at the feet of millions of devotees Bholenath | Shravan Somvar: हर हर महादेव...! श्रावण सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

Shravan Somvar: हर हर महादेव...! श्रावण सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्याच  श्रावण सोमवारी सुमारे पावणे दोन लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन ह्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे निसर्ग सौंदर्य फुलले असुन जिकडे तिकडे धबधबे हे खळखळुन वाहत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळुण  आला त्यामध्येच श्रावण महिन्याचा पहिला सोमवार त्या अगोदर दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेञ भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. रविवारीची सुट्टी लागुन असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला या तीन दिवसांमध्ये सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.
      
भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे डिंभे धरण, गोहे घाट, तसेच ठिक ठिकाणे थांबुन निसर्गाचा आनंद लुटत होते. वाहतुकीला सोपे व्हावे यासाठी  प्रशासनाकडुन पाच वाहनतळ ठेवण्यात आले होते. परंतू गर्दीचा ओघ बघता सर्व वहाने ही चौथ्या व पाचव्या थांब्याजवळ पार्क करण्यात आली होती. थांब्यापासुन भाविकांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ८ मिनीबस व २२ मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. शिवाजीनगर (पुणे) दर आर्ध्या तासाला जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सहाय्यक वाहतुक निरिक्षक प्रशिक्षण पुणे मारुती खळदकर व सहाय्यक वाहतुक अधिक्षक तुकाराम पवळे  हे वाहतुकीचे नियोजन करत होते.
      
मंचर भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर राजपुर पालखेवाडी जवळील शनिमंदीर तसेच म्हातारबाचीवाडी व ठिक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांना धक्केबुक्के खातच दर्शनाला जावे लागले. महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या अनागोंदी कारभारामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात लपंडाव चालू होता यामुळे मंदिर परिसरामध्ये अंधार पडला होता त्यामध्येच दाट असे धुके असल्यामुळे भाविकांना दर्शन बारी मध्ये चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण होत होती. या मध्येच आंबेगाव पंचायत समिती तसेच स्थानिक ग्रामपंचायत ह्यांच्या दुर्लक्षिततेमुळे  मारणारी मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे पायरी मार्गावरून अक्षरशः भाविकांना येताना जाताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मोकाट जनावरांचे मलमूत्र पायरी मार्गावरती पडल्यामुळे त्यामध्ये मुसळधार पाऊस यामुळे निसरडे होऊन आणि भाविक भक्त घसरून पडले यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
     
खेड पोलिस उपविभागिय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस निरिक्षक तीन सहाय्यक पोलिस निरिक्षक व ११ पोलिस उपनिरिक्षक ११२ पुरुष पोलिस कर्मचारी व १५ महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  अॅड. सुरेश कौदरे, भोरगिरी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताञय हिले, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे मंदीरामध्ये थांबुन भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था व समस्या सोडविण्याचे काम करत होते.

Web Title: Har Har Mahadev Shravan somvar at the feet of millions of devotees Bholenath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.