Bhimashankar Temple: हर हर महादेव...! श्रावणी सोमवारी भीमाशंकरला हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 03:08 PM2024-08-19T15:08:33+5:302024-08-19T15:09:23+5:30
गुरुवारी स्वातंत्र्यदिन अन् शनिवारी - रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा महापुर पहावयास मिळाला
भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसर्या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयघोष करत अधुन मधुन येणार्या हलक्या श्रावणाच्या सरी व दाट भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. या वेळी शिवलिंगावर आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली होती.
सोमवार (दि.१९) रोजी आज पहाटे चार वाजता मंदीर उघडण्यात आले. गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती दही दुग्ध असा महाजलाभिषेक करुण पुजा करण्यात आली. या नंतर डमरुनाद व शंखनाद ब्रम्ह वृंद गोरक्ष कौदरे यांनी करत महाआरती करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. गुरुवारी स्वातंत्र्यदिन शुक्रवारी, शनिवारी व रविवारी ह्या चारही दिवशी श्री क्षेञ भीमाशंकर येथे गर्दीचा प्रचंड महापुर पहावयास मिळाला ह्या चार दिवसामध्ये सुमारे साडे सात ते आठ लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.तिसरा श्रावणी सोमवार व त्यामध्येच रक्षाबंधन हा सण आल्यामुळे दिवसभरामध्ये गर्दीचे प्रमाण अत्यंत कमी होते. दुपारपर्यंत दर्शनबारी ही महाद्धाराच्या खालोखाल आली होती.
दर्शनपास व व्ही. आय. पी. दर्शन बंद केल्यामुळे येणाऱ्या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होत होते. स्वकाम सेवामंडळ आळंदी येथील भक्त गण मंदीर मंदीर परिसर दर्शनबारी पायरी मार्ग येथील स्वच्छता करत होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ९ मिनीबस व २६ मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे व सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वाहनतळे बस स्थानक, मंदीर परीसर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पायऱ्या, दर्शन बारी गाभार्या मध्ये मंदिर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे,भोरगिरी ग्रामपंचायत भीमाशंकरचे सरपंच दत्ताञय हिले, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, उदय गवांदे आशिश कोडिलकर, राहुल कोडीलकर, प्रसाद गवांदे मंदिरात थांबून मंदिरातील इतर नियोजन व भाविकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत होते.