उपचारासाठी खर्च करावा लागेल म्हणून केला विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:44 PM2021-04-07T18:44:11+5:302021-04-07T18:45:19+5:30
सासरच्या लोकांनी केली तब्बल १२ लाखांची मागणी
पिंपरी: विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करण्यास सुरुवात केली. ट्युमरचा त्रास असल्याने तिच्यावर उपचार करण्याऐवजी पैसे खर्च करावे लागतील म्हणून तिला माहेरी पाठवण्यात आले. त्यानंतर १२ लाख रुपये आणण्याची मागणी केली. याप्रकरणी सासरच्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०११ ते १६ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ६) फिर्याद दिली आहे. पती योगेश जगदीश तोलंबीया (वय ३६), सासरे जगदीश तोलंबीया, सासू ज्योती तोलंबीया (रा. किशनगंज, इंदूर, मध्यप्रदेश), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने शिवीगाळ, अपमान करून दारू पिऊन येऊन मारहाण केली. सासू, सासरे विवाहितेबाबत पतीला खोटे सांगून माहेरहून १२ लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे तगादा लावला. तसेच शारीरिक व मानसिक छळ केला. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी विवाहितेचे सिझेरियन झाले. त्याचा खर्च तिच्या वडिलांनी करावा, अशी त्यांची मागणी होती. दुस-या बाळंतपणाच्या वेळी विवाहितेला ट्युमरचा आजार झाला होता. तेव्हा तिच्यावर उपचार करण्याऐवजी पैसे खर्च होतील म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेसोबत भांडण करून तिला माहेरी पाठवण्यात आले.