चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; कौटुंबिक हिसांचार केल्याचा धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:31 PM2022-11-20T12:31:02+5:302022-11-20T12:31:32+5:30
पती,सासूसह दोन नणंदाविरोधात गुन्हा दाखल
सांगवी (बारामती): सासरच्या लोकांकडून विवाहितेला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून उपाशीपोटी ठेवत जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील मेडद येथून समोर आला आहे. याबाबत विवाहितेने पती,सासूसह दोन नणंदाविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साक्षी विशाल नेवसे, (वय २२) रा. मेडद (ता. बारामती जि पुणे), सध्या रा. - निमगाव केतकी ता. इंदापुर जि. पुणे) यांनी पती विशाल चंद्रकांत नेवसे,सासु कमल चंद्रकांत नेवसे, दोघे (रा. मेडद ता. बारामती ) नणंद जयश्री बाबा रासकर (रा. न्हावी ता. इंदापुर जि. पुणे), निमा संतोश दगडे, (रा.माळवाडी लोणी,ता. बारामती) यांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
४ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळोवेळी सासरी असताना चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ सुरू केला होता. पती विशाल चंद्रकांत नेवसे,सासु कमल चंद्रकांत नेवसे, ननंद जयश्री बाबा रासकर व निमा संतोश दगडे, यांनी सातत्याने चारित्र्यावर संशय घेऊन हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन उपाशी पोटी ठेवून मानसिक व शाररीक छळ केला होता. त्यानंतर विवाहितेच्या इच्छेविरुध्द जाऊन जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला असल्याचे नमूद फिर्यादीत म्हटले आहे.