Pune| आई-वडील जादूटोणा करीत असल्याच्या संशयाने छळ, विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:24 AM2022-02-18T09:24:43+5:302022-02-18T09:26:34+5:30
२ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या...
पुणे : आई-वडील जादूटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही, असा संशय घेऊन विवाहितेला मारहाण करून छळ केला जात होता. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. दत्तवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. अतुल गोरख साळवे (वय ३१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सासू सुनीता साळवे आणि दीर आकाश साळवे (रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कविता अतुल साळवे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी प्रकाश त्रिंबक तायडे (वय ६०, रा. बुलडाणा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कविता हिचा विवाह अतुल साळवे यांच्याशी झाला होता. सासरी नांदत असताना तुझ्यासोबत लग्न झाल्यामुळे माझे वाटोळे झाले. तुला घरातील काम करता येत नाही. तुझे आई-वडील जादूटोणा करतात. त्यामुळे मला यश येत नाही, असे बोलून तो तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असे. या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून कविता हिने २ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात अधिक तपास करीत आहेत.