व्याजाच्या पैशासाठी भाजीविक्रेत्या महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:24+5:302021-09-04T04:16:24+5:30
श्रीरामनगर भागात राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिटू भीमराव सकट (रा. तांदूळवाडी, बारामती) व दादा पाथरकर (रा. ...
श्रीरामनगर भागात राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिटू भीमराव सकट (रा. तांदूळवाडी, बारामती) व दादा पाथरकर (रा. आमराई, बारामती) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित महिला शहरातील गणेश मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करते. तेथे बिटू हा भाजीपाला घेण्यासाठी येत असल्याने त्यांची ओळख झाली होती. सन २०१७ मध्ये फिर्यादीला दवाखान्याच्या उपचारकामी पैशाची गरज होती. त्यामुळे तिने सकट याच्याकडून दरमहा शेकडा २५ टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. दरमहा १२ हजार ५०० रुपयांप्रमाणे तिने अडीच वर्षात ३ लाख ७५ हजार रुपये परत केले. मुद्दलाचे ५० हजार रुपये उरले होते. त्याची मागणी करत सकट याने महिलेला शिविगाळ, दमदाटी केली. पैसे देणे जमत नसेल तर गाडी ठेवण्याचा सल्ला दिला. जानेवारी २०२१ पासून पाच महिने फिर्यादीला व्याजाची रक्कम देणे जमले नाही. त्यामुळे त्याने फिर्यादीच्या ओळखीच्या एकाकडून एक कोरा चेक घेतला. फिर्यादीने दोन भिशी लावल्या होत्या. त्या सकट व त्याचा मित्र दादा पाथरकर हे चालवत होते. फिर्यादीची भिशी त्यांनी परस्पर उचलली. त्यातील फक्त ७ हजार रुपये फिर्यादीला परत केले. त्यामुळे ओळखीच्या मित्राचा चेक माघारी दे, अशी मागणी फिर्यादीने केली. परंतु त्याने तो परत केला नाही. २८ आॅगस्ट रोजी फिर्यादी हॉस्पिटलमध्ये गेली असताना तेथे सकट याने तिला गाठत पैशाची मागणी केली. शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.