सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे ७० तक्रारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:04+5:302021-07-25T04:11:04+5:30
पुणे : सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो, व्हिडिओमध्ये मार्फ करून ते सोशल साईटवरून पुन्हा अपलोड करून महिलांना त्रास देणे, ...
पुणे : सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो, व्हिडिओमध्ये मार्फ करून ते सोशल साईटवरून पुन्हा अपलोड करून महिलांना त्रास देणे, त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना असे मार्फ केलेले फोटो पाठवून त्यांची बदनामी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा हे काम त्यांच्या जवळचेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक करत असतात. त्यातून संबंधित तरुणी, महिलेचे मात्र आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येते. यावर्षी जुलैपर्यंत अशा जवळपास ७० तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. सायबर क्राईमबाबत दाखल होणाऱ्या एकूण तक्रारींपैकी २५ टक्के तक्रारी या सोशल मीडियाशी संबंधित असतात.
सोशल मीडियावर प्रामुख्याने फेसबुक, इंस्टाग्राम या साईटचा वापर अशा प्रकारे महिलांची बदनामी करण्यासाठी होत असल्याचे आढळून येत आहे. पुण्यातील एका डॉक्टरचे लग्न ठरलेले होते. त्याचवेळी त्याच्याबरोबर काम करणाऱ्या एका तरुणीने हे लग्न होऊ नये, म्हणून बनावट नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार केले. त्यात या डॉक्टर तरुणाचे ज्या तरुणीबरोबर लग्न होणार होते, तिचे मार्फ केलेले फोटो या तरुणाला पाठविले. सायबर पोलिसांनी शोध घेतल्यावर ते करणारी त्याची सहकारीच असल्याचे निष्पन्न झाले.
कुठल्या प्रकारचा होतो छळ
अनेकदा आपण कोणताही विचार न करता सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतो. असे फोटो घेऊन अनेक जण त्यात थोडा बदल करतात. ते फोटो पॉर्न साईटवर टाकून त्याखाली संबंधित महिलेचा मोबाईल नंबर टाकतात. त्यामुळे त्या महिलेला असंख्य फोन येतात. फोनवरून अश्लील भाषेचा वापर करतो. नको त्या बाबींची मागणी केली जाते.
काही वेळेला दुसऱ्या फोटोवर संबंधित तरुणीचा चेहरा लावून ते तिच्या मित्रमैत्रिणी, नातेवाइकांना पाठविले जाते. त्यातून तिची बदनामी केली जाते.
सोशल मीडियावर महिलांची बदनामीच्या तक्रारी
जुलै २०२१ - ७०
२०२० - १२०
........
अनेकदा अशाप्रकारे महिलांची बदनामीच्या तक्रारीचा तपास केल्यावर त्यातून या महिलांच्या जवळच्याच लोकांपैकी एकादा हा प्रकार केल्याचे निष्पन्न होते. मात्र, पुढील तपासासाठी ही तक्रार संबंधित पोलीस ठाण्याला पाठविल्यावर या महिला बदनामीच्या भीतीने फिर्याद देण्यास तयार होत नाहीत.
-डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे
..........
इथे करा तक्रार
कोणत्याही प्रकारे सायबर क्राईमचा प्रकार घडला असेल तर त्यासाठी तातडीने तक्रार करता यावी, यासाठी सायबर पोलिसांनी दोन व्हाॅट्सॲप नंबर जाहीर केले आहेत. त्यावर तक्रार करू शकता.
७०५८७१९३७१/७०५८७१९३७५