आठवडे बाजारातील जुन्या कपड्यांना कष्टकऱ्यांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:46+5:302020-12-14T04:27:46+5:30
इंदापूर : मागील सहा ते सात महिन्यांपासून राज्यात व देशात लॉकडाऊन होते. त्यामुळे कष्टकरी, हमाल, मापाडी व ऊसतोड मजूर ...
इंदापूर : मागील सहा ते सात महिन्यांपासून राज्यात व देशात लॉकडाऊन होते. त्यामुळे कष्टकरी, हमाल, मापाडी व ऊसतोड मजूर व बिगारी यांच्या हाताला काम नव्हते. मधेच दिवाळी सण आला. तो सणही यंदा कोरडा गेला. मात्र सध्या हाताला थोडेफार काम मिळत असल्यामुळे पैसे वाचवण्यासाठी कष्टकरी जुन्या बाजारातील कपडे घेण्यास पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आहेत. सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरदार चालू आहे. इंदापूर तालुक्यात ऊस तोडणी करण्यासाठी बिहार, उत्तरप्रदेश, राज्यातील विदर्भ, मराठवाडा या भागातील ऊसतोड मजूर इंदापूर तालुक्यात मोठ्या संख्येने उदरनिर्वाहासाठी आले आहेत. त्यांना रविवारचा आठवडे बाजार भरण्यासाठी इंदापूर हे केंद्रस्थान आहे.
इंदापूर तालुक्यात गवंडी काम व बिगारी काम करणारे बहुतांश बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश नागरिक आले आहेत. त्यांना बिहारी म्हणून या भागात ओळखले जाते. त्यांना परवडेल अशा दैनंदिन वापरातील कपडे हे आठवडी बाजारात मिळत असल्याने रविवारी या जुन्या कपड्यांच्या दुकानावर गर्दी असते.
सामन्य कुटुंबातील नागरिकांनी दिवाळीला बाजारपेठेतील कापडदुकानातून केवळ मुलांसाठी कपडे खरेदी केले असल्याचे कापड दुकानदारांनी सांगितले.
अनलॉक झाल्याने आठवडी भाजी मंडई बाजार भरत आहे. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला असल्याने, एरवी ३० ते ४० रुपयांना मिळणारी मेथीची भाजी व कोथिंबीरीच्या चार पेंड्या १० रुपयांना मिळत आहेत. तर कांदा, बटाटा, लसणाचा दर मात्र आहे तोच आहे. बाकी भाजीपाला अगदी स्वस्त झाला आहे.
कष्टकऱ्यांना १०० ते १५० रुपयांना जीन्स पॅन्ट व ७० ते १०० रुपयांपर्यंत शर्ट व १०० ते २०० रुपयांपर्यंत साडी या जुन्या बाजारात मिळत असल्याने त्यांच्या खिशाला परवडेल अशी कपडे या ठिकाणी खरेदी केली जातात. या सहा महिन्यात गळीत हंगाम संपल्यानंतर पुढील सहा महिने गावाकडे गेल्यावर घर प्रपंचा चालावा यासाठी पैशांची बचत करून हे कष्टकरी ठेवत आहेत.
१३ इंदापूर
इंदापूर येथे रविवारच्या आठवडी बाजारात जुने कपडे खरेदी करण्यासाठी कष्टकाऱ्यांची झालेली गर्दी