जिद्द, कठोर मेहनतीची आवश्यकता - तेजश्री नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:46 AM2018-02-24T01:46:19+5:302018-02-24T01:46:19+5:30
तेजश्री नाईक म्हणाल्या, यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी व आत्मविश्वास अंगी असणे गरजेचे आहे. तो आत्मविश्वास मनात ठेवून मी खेळायला सुरुवात केली.
तेजश्री नाईक म्हणाल्या, यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी व आत्मविश्वास अंगी असणे गरजेचे आहे. तो आत्मविश्वास मनात ठेवून मी खेळायला सुरुवात केली. वयाच्या ९ व्या वर्षापासून मी हा खेळ खेळत आहे. यामध्ये मला सर्वात जास्त माझ्या आई-वडिलांची प्रेरणा मिळाली. माझ्या खेळासाठी मला ते खूप मदत करीत होते. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक भास्कर भोसले यांनी मला या खेळासाठी मार्गदर्शन केले. २००६ मध्ये मी पोहण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर २००८ मध्ये पहिली राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा झाली. त्यामध्येही मी भाग घेतला. नंतर मला ट्रायथलॉन खेळाची माहिती मिळाली व त्यामध्ये मला आवड निर्माण झाल्याने मी त्याचा सराव सुरू केला, यानंतर माझी निवड ट्रायथलॉन स्पर्धेत झाली. मी याचा सराव सुरू केला. २००८ ला माझी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. त्यानंतर २०१५ पर्यंत मी हा खेळ खेळत आली आहे. ट्रायथलॉन खेळ म्हणजे या खेळात दीड किलोमीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकलिंग, १० किलोमीटर पळणे हे तीन खेळ सलग न थांबता खेळायला लागतात. माझी जेव्हा २०१५ ची राष्ट्रीय स्पर्धा केरला येथे झाली त्यामध्ये मला रौप्य आणि कांस्यपदके मिळाली, यांनतर वडिलांच्या निधनानंतर मी खेळामध्ये अंतर ठेवले. खेळापासून लांब गेल्याने मी खूप विचलित झाल्यामुळे मला माझ्या काका राजेंद्र नाईक यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मी पुन्हा खेळासाठी सराव सुरू केला.
नाईक म्हणाल्या, की मी जेव्हापासून खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला ८ पदके मिळाली. एकूण २ सुवर्णपदके मिळाली. एकावेळी ३ खेळ खेळणे हे खूप अवघड आहे. यासाठी पूर्णपणे ऊर्जा, आपली मानसिक तयारी असणे गरजेचे असते. मन एकाग्र करून हा खेळ खेळावा लागतो. सहजासहजी कोणतेही यश मिळविता येत नाही. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अंगी आत्मविश्वास असावा लागतो, तरच अनेक अडथळ्यांवर मात करून यशाला गवसणी घालता येते, तुमच्याकडे चांगले ज्ञान असेल किंवा साहसी खेळातील अनुभव आणि तांत्रिक ज्ञान असेल तर या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. जर तरुणाईला खेळामध्ये याची मनापासून आवड, आणि कौशल्य तुमच्या अंगी असेल तर यश हे नक्कीच मिळते. आजच्या युगामध्ये शारीरिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी व ताण-तणाव कमी करण्यासाठी खेळणे व निरोगी राहण्याचे महत्त्व जपणे आवश्यक आहे. ट्रायथलॉन खेळात आजच्या तरुणाईला करिअर करण्याची संधी आहे. यामध्ये एशियन स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. जर आपल्याला ट्रायथलॉन या खेळामध्ये करिअर करायचे असेल तर त्यासाठी जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अंगी असेल तर आणि तरच अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. खेळासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण, साधनसामग्री, क्रीडांगण आणि पोषक आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देऊन उत्तम खेळ खेळला तर क्रीडा या माध्यमातून देशाची तरुण पिढी सक्षम होईलच; पण देशालाही जगात सन्मान मिळेल. माझ्या यशाच्या मागे माझ्या आई-वडील, तसेच काका यांचा पाठिंबा असल्याने मी आज पुरस्कार प्राप्त करू शकले.
हा पुरस्कार त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे. मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणे माझ्या वडिलांचे व काकांचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले कारण माझ्यासाठी ते खूप झटले, नेहमी त्यांनी मला मार्गदर्शन केले. पण आज ते माझ्यासोबत नाहीत, याची खंत मला नेहमी जाणवेल, असे तेजश्री नाईक यांनी सांगितले.