मजुराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:42+5:302021-03-05T04:12:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मजुरीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या मजुराला रॉडने मारहाण करीत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराला सत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मजुरीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या मजुराला रॉडने मारहाण करीत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराला सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी.
महादेव नाना सावळे असे शिक्षा झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात रमेश ज्ञानेश्वर गालफाडे या मजुराचा मृत्यू झाला होता. हा प्रकार पिंपरीतील रमाबाईनगर कमानीजवळील रस्त्यावर १ ऑक्टोंबर २०१४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला होता.
या प्रकरणी रमेश यांचा भाऊ दिलीप सावळे (वय ३१, रा. रमाबाईनगर झोपटपट्टी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. महादेव आणि त्याचे वडील नाना यमाजी सावळे हे रंगकामाचे ठेके घेतात. घटनेच्या एक आठवडा आधी रमेश हे महादेव याच्याकडे रंगकामासाठी दैंनदिन मजुरीवर कामाला गेले होते. आदल्या दिवशी रमेश हे ठेकेदाराकडे मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना ठेकेदारांनी शिवीगाळ करून हाकलून दिले होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळी मारहाण केल्यानंतर त्यांच्यात समझोता झाला होता. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नव्हती. त्याच रात्री रमेश यांच्या पोटात जास्त त्रास होवू लागल्याने त्यांना पिंपरी येथील वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. दुसरर्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
या खटल्यात सरकारी वकील सुनील मोरे यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले.