अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:39+5:302021-05-05T04:17:39+5:30
पुणे: उस्मानाबाद येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि १८ हजार रुपये दंडाची ...
पुणे: उस्मानाबाद येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडांपैकी १५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. पूरवार यांनी हा निकाल दिला.
सुशील दिनेश भडकवाड (वय ३०) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जुलै २०१६ मध्ये हा प्रकार घडला. पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. भडकवाड याने फूस लावून अल्पवयीन पीडितेला उस्मानाबाद येथे पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३६६ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील एन. डी. पाटील (धायगावे) आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले. वानवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. घाटे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ए. एस. गायकवाड आणि पी. पी. पवार यांनी मदत केली.
-----------------------------------