अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:50+5:302021-06-16T04:15:50+5:30
पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी ६ महिने सक्तमजुरी ...
पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी ६ महिने सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अमोल घाटे (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.
याप्रकरणी एका १४ वर्षांच्या मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. ही घटना ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१८मध्ये घडली.
अमोल घाटे हा फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत. मी तुझा मित्र असून तुला खूप लाईक करतो. माझ्या मोबाईलवर व्हॉटसॲपला हाय म्हणून मेसेज पाठव, उद्या भेटू असे म्हणून पाठलाग करत विनयभंग केला होता. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गावडे यांनी केला. या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी ६ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी व तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून आर. एन. कांबळे यांनी काम पाहिले.