हृदयावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
By Admin | Published: September 20, 2016 01:31 AM2016-09-20T01:31:01+5:302016-09-20T01:31:01+5:30
हृदयावरील उपचारांमध्ये अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची समजली जाणारी एएफ अॅबलेशन ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीपणे करण्यात आली.
पुणे : हृदयावरील उपचारांमध्ये अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची समजली जाणारी एएफ अॅबलेशन ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ३ डी मॅपिंग आणि कॉन्टॅक्ट फोर्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
ससून शासकीय रुग्णालयातील कॅथलॅबचे यामध्ये मोठे योगदान असून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ७४ वर्षे वयाच्या महिलेवर हृदयविकाराचे ठोके अनियमित असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या महिलेला काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासास त्रास होणे, दम लागणे, छातीत धडधड होणे या तक्रारी होत्या.
रुग्ण महिलेवर विविध औषधोपचार करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजकुमार मंत्रवादी डॉ. हेमंत कोकणे यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यामध्ये डॉ. कल्पना केळकर व डॉ. योगेश गवळी यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम केले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले व कॅथलॅबचे प्रमुख डॉ.
एन. जी. करंदीकर यांनी सहकार्य केले.
ससून रुग्णालयात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, हृदयातील छिद्र बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेने बुजविणे यांसारखे अनेक उपचार मोफत केले जातात. आता हृदयाचे ठोके अनियमित पडणे या गुंतागुंतीवरही उपचार उपलब्ध झाल्याने गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.