कष्टाला आले फळ : झोपडपट्टीतील ‘विकास’ बनला सीए
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:34 PM2021-02-03T15:34:20+5:302021-02-03T15:39:00+5:30
आई धुणीभांडी करते तर वडील करतात मजुरी...
लक्ष्मण मोरे -
पुणे : झोपडपट्टीमधील खुराडेवजा खोली... वडिल मोलमजुरी करणारे तर आई धुणी-भांडी करणारी... अठरा विश्व दारिद्रय अन अशिक्षितपणाचा वारसा... आसपास गुन्हेगारी आणि सततची भांडणे... अशा विपरीत परिस्थितीमध्ये स्वत:च्या जिद्दीने एका तरुणाने यश खेचून आणले आहे. सहकारनगरच्या सिद्धार्थ वसाहतीमधील ‘विकास’ सीए झाला आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करुन अडचणींचे डोंगर पार करता येतात हेच त्याने दाखवून दिले आहे.
सहकारनगर येथील सिद्धार्थ वसाहत नावाची झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीमध्ये अर्जून लोखंडे आणि त्यांची पत्नी रेखा हे कष्टकरी दाम्पत्य राहते. त्यांना विकास आणि हर्षद ही दोन मुले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज जवळील खंडाळे गावामधून लोखंडे पोटाची खळगी भरण्यासाठी 1989 साली पुण्यात आले. सुरुवातील मोलमजुरी करुन उदरनिर्वाह केला. रस्त्याच्या कडेला दुकानांसमोरील मोकळ्या जागेत झोपायचे आणि तेथेच गॅरेजमध्ये काम करायचे असा शिरस्ता अनेक वर्ष चालला.
त्यानंतर, झोपडपट्टीत एक छोटी झोपडी मिळाली. तेथेच संसार सुरु झाला. आपल्या मुलांनी शिकावे, साहेब बनावे, त्यांना कष्टाची कामे करावी लागू नयेत ही भावना मनात ठेवून दोघे पती पत्नी दिवसरात्र मेहनत करीत होते. माध्यमिकपर्यंतचे शिक्षण गावीच घेतलेला विकास सीए व्हायचे म्हणून पुण्यात आईवडिलांकडे आला. त्याचा भाऊ हर्षद एमकॉम झाला असून स्पर्धा परिक्षांची तयारी करीत आहे.
आईवडिलांचे कष्ट पाहून विकासच्या मनाला वेदना होत. आपण आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, त्यांचे कष्ट दूर करुन त्यांना सुखाचे चार दिवस दाखवावेत असे त्याला सतत वाटायचे. झोपडपट्टीतल्या त्या छोट्याश्या खोलीत त्याचा अभ्यास सुरु असायचा. सीए व्हायचे म्हणून त्याने नाना पेठेतील एका सीएकडे नोकरी करायला सुरुवात केली. अल्प वेतनावर काम करीत असताना त्याने अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. दोन वेळा त्याला अपयशही आले. परंतु, तो जिद्द हरला नाही. त्याने पुन्हा तिस-यांदा परिक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये तो सीएची परिक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशामुळे आईवडिल आनंदित असून झोपडपट्टीतही त्याच्या यशाचे दाखले दिले जाऊ लागले आहेत. वस्तीमधील नागरिकांनी स्वयंप्रेरणेने बॅनर लावून त्याचे कौतूक केले आहे. त्याच्या घरी जाऊन सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सत्कार करु लागले आहेत. मुलाचे हे कौतूक बघून आईवडिलांचे डोळे मात्र कौतूकाने भरुन येत आहेत..
====
आमच्या मुलाने आमच्या कष्टाचे चीज केले. आम्ही धुणीभांडी, मोलमजुरी करुन मुलांना शिकविले. त्याने हार मानली नाही. गरिबी, झोपडपट्टीतलं जगणं, हालअपेष्टा सहन करुनही त्याने हे यश मिळविले त्याचा खूप अभिमान वाटतो. समाजात त्याने आमची मान गर्वाने उंचावली आहे. आमच्या जगण्यांचं सार्थक झालं.
- अर्जून व रेखा लोखंडे (आईवडील)
====
आईवडिलांनी प्रचंड कष्ट केले. गावाकडून पुण्यात केवळ पोट भरण्यासाठी पुण्यात आल्यानंतरही त्यांनी आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. घरची परिस्थिती पाहून कधीकधी शिक्षण सोडून नोकरी करावी असे वाटत होते. पण, आईवडिल सतत प्रेरणा द्यायचे. त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याचे मी ठरविले होते. मला मिळालेले यश ही त्यांच्या कष्टाची पुण्याई आहे. मी सीए झालोय यावर अजूनही विश्वास बसत नाही.
- विकास अर्जुन लोखंडे
====