वारसा संवर्धनाला दुर्मिळतेचा अडथळा
By admin | Published: April 18, 2017 02:44 AM2017-04-18T02:44:27+5:302017-04-18T02:44:27+5:30
देश आणि शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेची प्रतीके असलेली जवळपास अडीचशे वारसा स्थळे शहरात उभी आहेत. बहुतांश वास्तू या
पुणे : देश आणि शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेची प्रतीके असलेली जवळपास अडीचशे वारसा स्थळे शहरात उभी आहेत. बहुतांश वास्तू या ब्रिटिशकालीन असल्याने त्या वेळेची बांधकाम शैली, त्या काळाशी साधर्म्य सांगणारा कच्चा माल याची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे. लाल महाल, नानावाडा, विश्रामबागवाडा अशी स्थळे यातूनही पुन्हा नव्याने उभारी घेत असून, लवकरच त्याचे नवे रूप समोर येत आहे. भविष्यात पुणे दर्शनप्रमाणेच या वारसास्थळांचीच स्वतंत्र सैर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
राज्य सरकारने १९९८ मध्ये राज्यातील महापालिकांना ऐतिहासिक वारसास्थळांची यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था, स्थळे यांना प्रथम, शहरासाठी महत्त्वाची असलेल्या वास्तू द्वितीय आणि जुन्या शैलीतील बांधकाम व इतर वास्तूंचे वर्गीकरण तृतीय श्रेणीत करण्यात येते. शहरात प्रथम श्रेणीच्या ७७ वास्तू आहेत. त्यात आगाखान पॅलेस, सिटी पोस्ट, कृषि महाविद्यालय, डेक्कन महाविद्याल, फर्ग्युसन महाविद्यालय, गोखले इन्स्टिट्यूट, ससून, केसरीवाडा अशा अनेक महत्त्वाच्या वास्तूंचा समावेश आहे.
द्वितीय श्रेणीत बीएमसीसी महाविद्यालयाजवळील आघारकर संस्था, बंडगार्डन पूल, गुंडाचा गणपती, हॅरिस पूल, नागनाथ पार, गरपतगीर विष्णू मंदिर, शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारुती, लॉ कॉलेज रस्त्यावरील प्रभात स्टुडिओ (फिल्म इन्स्टिट्यूट) अशा ८३, तर तृतीय श्रेणीत आॅल इंडिया रेडिओ, डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन आणि टपाल कार्यालय सावरकर स्मारक अशा ८५ संस्था आहेत. यातील जवळपास ६० वास्तू या खासगी मालकीच्या आहेत.
१नानावाड्याच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. तेथे १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या व्यक्तिशिल्पे आणि ऐतिहासिक माहिती असलेले म्युझियम उभारण्यात येणार आहे. हे म्युझियम तयार होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. या इमारतीची डागडुजी करताना पहिल्या मजल्यावर भित्तीचित्र होते.
२एका बाजूला कललेल्या या भिंतीची डागडुजी आवश्यक होती. डागडुजी करताना चित्राला नुकसान होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे होते. त्यासाठी चित्र असलेली बाजू प्लॅस्टिक आणि प्लायवूडने पाच वर्षे झाकून ठेवण्यात आली होती. वाड्याच्या संवर्धन कामासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला असून, म्युझियमसाठी ४ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.