हरे राम, हरे कृष्णाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा ! हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 04:42 PM2024-07-07T16:42:48+5:302024-07-07T16:44:09+5:30

भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली होती.

Hare Ram Hare Krishna Jagannath Rath Yatra A community of thousands thronged the area in pune | हरे राम, हरे कृष्णाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा ! हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमला

हरे राम, हरे कृष्णाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा ! हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमला

पुणे: हरे रामा, हरे कृष्णाच्या जयघोषात अन् जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राचे नामस्मरण केल्याने मध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्रासह तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव उत्साहात झाला.

ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा मोठया उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हा महामहोत्सव दरवर्षी आयोजिला होता. यंदाचे हे ८ वे वर्ष आहे. खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे, इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. कृष्णचैतन्य स्वामी, प्रबोधानंद स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते स.प.महाविद्यालयाच्या प्रांगणात आरती करुन रथयात्रेला प्रारंभ झाला. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली होती. रथयात्रा समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती देखील झाली. रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली.

भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.

Web Title: Hare Ram Hare Krishna Jagannath Rath Yatra A community of thousands thronged the area in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.