कोरोनामुळे यंदा घरोघरीच होणार 'हरित वारी' चा गजर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 07:16 AM2020-06-14T07:16:08+5:302020-06-14T07:20:02+5:30
गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वरमहाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत.
श्रीकिशन काळे
पुणे : कोरोनामुळे यंदा पालखी सोहळ्यातील पर्यावरण वारी घरीच रोपं लावून साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी पर्यावरण दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी होऊन वृक्षलागवड करीत असतात. पण आता वारी नसल्याने या दिंडीतील वारकरी घरी आणि आजुबाजूच्या परिसरात रोपं लावून त्याची जोपासना करणार आहेत. 'हरित वारी, आपआपल्या घरी' याप्रमाणे ही वारी सुरू झाली आहे.
गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वर महाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत. त्या दिंडीमधून ठिकठिकाणी वृक्षलागवड करणे, वारकऱ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत प्रबोधन करण्याचे काम केले जाते. या वषीर्ची पर्यावरण वारी जरा अनोखी आहे. वारकऱ्यांसोबतच नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.
वृक्षलागवड ही राष्ट्रभक्ती समजून कार्य करणारे कवी चंद्रकांत शहासने यांनी हरिपाठासारखे निसर्गपाठाची रचना केली आहे. रोप लावल्यानंतर त्यासमोर हा निसर्ग पाठ वाचू शकता. 'चला लावू झाडे, वाढवूया वने, टाळू सर्व चाळे, दुष्काळाचे.. ' अशाप्रकारे या निसर्गपाठाची सुरवात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हा निसर्गपाठ वारकºयांपर्यंत पोचविण्यात येत आहे. हा उपक्रम वनअधिकारी रंगनाथ नाईकडे, श्रीपाद कोंडे, गायत्री कोंडे राबवत आहेत. याविषयी श्रीपाद कोंडे म्हणाले, यंदाची वारी हरित व्हावी, म्हणून प्रयत्न करायला हवा. वड, पिंपळ, कडूनिंब अशी देशी झाडं लावून निसर्ग संवर्धन करावे. हीच घरी यंदाची वारी असणार आहे.
घरीच फुलेल हरित वारी
या हरित वारीसाठी घरी रोपं लावून ते वाढवावे, जपावे हा एक चांगला संदेश जात आहे. वृक्षलागवड केली जाते. पण नंतर लक्ष दिले जात नाही. पण या वारीत आषाढीपर्यंत रोपं चांगले वाढेल. नंतर इतरत्र कुठेही ते लावता येईल. तसेच घरातील कचरा हा कंपोस्ट खत म्हणून रोपाला घालता येईल. त्यातून रोपाची चांगली वाढ होईल. पायी वारी नसली, तरी ही हरित वारी करून विठ्ठलाला घरातून नमन करूया, अशा भावना पालखी सोहळ्यात सहभागी होणाºया अनुष्का कजबजे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी देखील बाल्कनीत रोप लावले आहे.
यंदा गुळवेल वनस्पतीचे प्रबोधन
यंदा पायी वारी नसली तरी घरोघरीच पर्यावरणाची वारी घडविणार आहोत. वारकरी आपल्या घरी, आजुबाजुला रोपं लावत आहेत. त्यातून ही पर्यावरणाची वारी फुलत राहील. गेली ४० वर्षांपासून आम्ही वारी करतोय. अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत पर्यावरण दिंडी सुरू केली. आजपर्यंत १५ हजार रोपं लावली आहेत. यंदा गुळवेल मोठ्या प्रमाणात लावावे यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण ही एक औषधी वनस्पती आहे. मधुमेह, थंडी, ताप अशा आजारांवर गुणकारी आहे. आमचे वारकरी ज्ञानेश्वर सांगळे आणि अजून बरेच आहेत, ते खूप रोपं लावण्यासाठी काम करतात. प्रत्येकाने झाड लावावे, त्याची जोपासना करावी आणि यंदाची ही वारी घरीच बसून साजरी करावी.
- ज्ञानेश्वर महाराज वाबळे, पर्यावरण दिंडी