हॅरिस पूल दुभाजकातील फट बुजविली
By admin | Published: June 30, 2015 12:13 AM2015-06-30T00:13:48+5:302015-06-30T00:13:48+5:30
वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटण्यासाठी दापोडीतील हॅरिस पुलावर विरुद्ध बाजूने जाणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पिंपरी : वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटण्यासाठी दापोडीतील हॅरिस पुलावर विरुद्ध बाजूने जाणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुलाशेजारच्या तुटलेल्या दुभाजकांतून दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन रेटत होते. या दुभाजकांतील मोकळी फट बंद करण्यात आली आहे.
कोंडीतून सुटण्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार सीएमई गेट चौकातून वळण घेत विरुद्ध दिशेने हॅरिस पुलावर प्रवेश करतात. विरुद्ध बाजूने जात बोपोडी सिग्नल चौकात थांबतात. याच पद्धतीने हॅरिस पुलाजवळील तुटलेल्या दुभाजकामधून दुचाकी काढून विरुद्ध दिशेने वाहन काढले जाते. एकापाठोपाठ एक असे असंख्य दुचाकीस्वार हा मार्ग अवलंबत असल्याने वाहनांची रांग लागते. दुचाकीस्वारांचे पाहून तीनचाकी रिक्षा, टेम्पोचालकही विरुद्ध दिशेने जात होते. त्याचबरोबर पदपथावरून वाहने दामटली जातात. पुलाचे संरक्षक कठडे कमी उंचीचे आणि कमकुवत आहेत. कठड्यास धडकून वाहन नदीत पडून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेशिस्त वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत होते.
विरुद्ध दिशेने वाहन येत असल्याने पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडत असे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी या संदर्भात ठोस भूमिका घेण्याची नितांत गरज आहे. विरुद्ध दिशेने वाहने
जाणार नाहीत यासाठी पोलिसांनी कठोर धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ने १६ जूनला या संदर्भात छायाचित्रासह ‘कोंडीतून सुटण्याचा जीवघेणा प्रयत्न’ या शीर्षकखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी दुसऱ्या दिवशीपासूनच कारवाई सुरू केली. तुटलेला दुभाजक दुरुस्त करून बेशिस्त दुचाकीस्वारांना लगाम घातला आहे. वेळ वाचविण्यासाठी ‘शॉर्टकट’ने विरुद्ध दिशेने जाण्यास दुचाकीस्वार, रिक्षाचालकांना अटकाव केला जात आहे.
ग्रेड सेपरेटरमधून वेगात येणारी वाहने अरुंद रस्त्यामुळे दापोडी येथील हॅरीस पुलावर अडकून पडतात. वर्दळीच्या सकाळ, संध्याकाळच्या वेळी, तसेच दिवसभर अनेकदा येथे वाहतूककोंडी होते. कोंडीत अडकून एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. बोपोडी, खडकी बाजारकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने ही कोंडी नियमितपणे होत आहे. ही वाहतूककोंडी सुटल्याने नोकरदारांना वेळेवर कामावर जाता येते. तसेच बराच काळ वाहतूक खोळंबल्याने दूरचा प्रवास करणाऱ्या नागरिकांचेही हाल होत होते. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत व्हावी अशी मागणी केली जात होती.