हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:46+5:302020-12-17T04:37:46+5:30

पुणे : ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (वय ४३) यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परेदशी ...

Harshvardhan Jadhav remanded in police custody till December 18 | हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Next

पुणे : ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (वय ४३) यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परेदशी यांनी बुधवारी (दि. १६) १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अमन चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास औंध येथील संधवीनगर येथे घडली होती. यात अजय चरणजितलाल चड्डा (वय ५५) आणि ममता अजय चड्डा (वय ४८) हे जखमी झाले आहेत.

अजय चड्डा व ममता चड्डा हे दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांच्या गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने त्यात ममता चड्डा यांच्या पायाला लागले. त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता जाधव यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याबरोबरील महिला इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांनीही शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. चड्डा यांनी आपली ह्दयशस्त्रक्रिया झाली असल्याचे सांगितल्यानंतरही जाधव यांनी मारहाण केली.

त्यानंतर चड्डा यांच्या मुलांनी दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना वाटेत जाधव यांची गाडी जाताना दिसली. ते त्याच्या मागोमाग गेले. आंबेडकर चौकाच्या अलिकडे जाधव यांच्या गाडीने आणखी एकाला धडक दिल्याने तेथे लोकांनी जाधव यांना मारहाण केली. त्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी जाधव यांना औंध चौकीत नेले. जाधव यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी जाधव यांना औंध रुग्णालयात नेले. तेथून रात्री ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. तेव्हा आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर १५ डिसेंबरला दुपारी ते ससून रुग्णालयातून उपचार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेत असताना रात्री ९ वाजता त्यांनी पुन्हा आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्यावर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

हर्षवर्धन जाधव यांना बुधवारी (दि. १६) शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. हा गुन्हा अजामीनपात्र आहे, या प्रकरणात इषा बालाकांत झा यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्यांना अटक करणे बाकी आहे. तसेच हल्ला करण्याच्या अन्य कारणांचा तपास करायचा असल्याचे सांगत सरकारी वकील व्ही. सी. मुरळीकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करुन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. दरम्यान, अजय आणि ममता चड्डा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Harshvardhan Jadhav remanded in police custody till December 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.