वडिलांच्या भाजप प्रवेशानंतरदेखील कन्या काँग्रेसमध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 09:10 PM2019-09-11T21:10:48+5:302019-09-11T21:12:19+5:30
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या कन्येला पक्षांतरी बंदी कायद्यामुळे काॅंग्रेसमध्येच रहावे लागणार आहे.
सतीश सांगळे
कळस : इंदापुर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी मुंबई मध्ये भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मात्र,त्यांची कन्या जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकीता पाटील यांनी पक्षांतर बंदी कायद्यामुळे प्रवेश टाळला आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे . काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य आहेत. यामध्ये भोर येथील संग्राम थोपटे यांचे तीन समर्थक व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांचा एक पाटील समर्थक इंदापुर मधुन निवडुन आलेले तीन सदस्य आहेत . त्यामध्ये पाटील यांची कन्या अंकिता पाटील, निमगाव केतकी निमसाखर गटातील भारती दुधाळ, सणसर लासुर्णे गटातील सागर भोसले यांचा समावेश आहे. इंदापुर पंचायत समितीमध्ये आठ सदस्य काँग्रेस पक्षाचे आहेत.सर्व पाटील समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण नाही. मात्र, जिल्हा परिषदेत या पाटील समर्थक सदस्यांची पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाने अडचण निर्माण झाली आहे.
पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार मूळ कायद्यात एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते वैध मानले जायचे. मात्र, २०१६ मध्ये जिल्हा परीषद सदस्यांसाठी पक्षांतर बंदी कायदा लागु करण्यात आला आहे. एखादा पक्षातुन निवडुन आल्यानंतर त्यांना त्याच पक्षात रहावे लागणार आहे. पक्षांतर केल्यास त्याला अपात्र घोषित केले जाणार आहे. तसेच सहा वर्ष निवडणुक लढविता येणार नाही. शिवाय अपात्रतेच्या काळात त्याला कोणतेही लाभाचे पद मिळणार नाही. तसेच जिल्हाधिकारी, आयुक्तांना एक वर्षाच्या आत अपात्रतेवर निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास अपात्र ठरू शकतात. अन्य पक्षात प्रवेश करणे किंवा पक्षादेश डालवून मतदान केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो. याशिवाय अन्य पक्षांना मदत करणे किंवा त्यांच्या बैठकांना हजेरी लावल्यासही सदस्य अपात्र ठरू शकतो. यामुळे तालुक्यात नेत्यांच्या भाजपप्रवेशानंतर केवळ मनानेच भाजपमध्ये जाणार आहेत. तांत्रिक दृष्ट्या त्यांना काँग्रेसचा आदेश मानावा लागणार आहे. यातुन जिल्हा परिषदेच्या सदस्यांची कोंडी होणार असल्याचे वास्तव आहे.
पाटील यांची कन्या अंकिता यांची नुकतीच जिल्हा परिषदेवर निवड झाली आहे. पाटील यांच्या संभाव्य भाजप पक्ष प्रवेशामुळे मागील आठवड्यात व पंधरा दिवसापुर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होऊनही त्यांना स्थायी समितीच्या सदस्य पदांपासुन दूर ठेवण्यात आले. त्यामुळे पुढील आगामी काळात त्यांची कोंडी होणार आहे. आगामी निवडणुकीत मनाने व ताकदीने हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर असले तरीही तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस पक्षाचे रहावे लागणार आहे.