हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 03:49 PM2024-10-18T15:49:22+5:302024-10-18T15:50:13+5:30

आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम, पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना!

Harshvardhan Patil entry stirs excitement in Indapur Preparations for the third alliance, focus on Pawar's decision | हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर होताच इंदापूर मध्ये तिसरी आघाडी निर्माण होऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला त्याच ठिकाणी जनता मेळावा घेतला. गर्दीही जमवली पण त्यात ठोस भूमिकाच घेतली नाही. किंवा त्यानंतरही काहीच दिशाच ठरवली गेली नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीतील नेते शरद पवार यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. 

आप्पासाहेब जगदाळे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. परंतू एकदा आ.भरणे यांनी तर दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावनिक करुन, जगदाळे यांना उमेदवारीपासून वंचित ठेवले आहे. आपल्या सरळ स्वभावाचा फायदा त्यांनी घेतल्याचे जगदाळे यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. यंदा त्यांना निवडणूक लढवायची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन शतके झाली. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे हे दोघे एकाकी पडल्यानंतर जगदाळे यांनी विनाअट शरद पवार यांना पाठींबा दिला. खा.सुप्रिया सुळे यांचा  हिरीरीने प्रचार ही केला. यंदाच्या निवडणुकीत त्याचा निश्चितपणे फायदा होईल असे त्यांना वाटले होते. मात्र इच्छुकांची गर्दी वाढली अन् त्यामध्ये भर म्हणून शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे ओढले. त्यामुळे जगदाळे यांच्या आकांक्षेवर पुन्हा एकदा पाणी पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  या परिस्थितीत इच्छुकांच्या रेट्याने हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची रणनिती आप्पासाहेब जगदाळे यांनी आखली. त्यांना प्रवीण माने यांची साथ मिळाली. प्रवीण माने यांना ही यंदा विधानसभा निवडणूक लढवायची आहे. जगदाळे यांना व माने यांना मलाच उमेदवारी हवी आहे, असे थेट म्हणता येईना, अशी गोची होवून बसली आहे. शरद पवार यांनी या दोघांना ही आपली ताकद वाढवा. पक्ष संघटन अधिक मजबूत करा. भविष्यात तुम्हाला चांगली संधी नक्कीच मिळेल असे सांगितल्याची खात्रीशीर माहिती आहे. मात्र या दोघांना आ. दत्तात्रय भरणे ही नकोत अन् हर्षवर्धन पाटील त्याहून नको आहेत.
    
प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी सुमारे ऐंशी गावात खा. सुप्रिया सुळे यांचा एकहाती प्रचार केला आणि प्रचाराला रीतसर प्रारंभ होण्याच्या एक दिवस आधी खा.सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परत ते शरद पवारांकडे आहे. ही जी धरसोडीची भूमिका घेतली ती शरद पवारांना आवडली नाही. हे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या टीकेवरुन स्पष्ट झाले होते. त्यांना उमेदवारी न देण्यामागे हीच बाब कारणीभूत असावी असा जाणकारांना वाटते आहे.
    
या तीन चार दिवसात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांची बैठक झाली. त्यानंतर पुण्यात शरद पवारांनी ही त्यांना बोलावून घेतले होते, असे सांगितले जात नाही. या दोघांनी ही त्यास दुजोरा दिला नाही. या पार्श्‍वभूमीवर जगदाळे व माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे ही बोलले जात आहे. पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना. त्यापेक्षही हे दोघेही शरद पवार यांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत तिसरी आघाडी अस्तित्वात आहे की नाही  असा प्रश्नही  इंदापूरकरांमधून विचारला जाऊ लागला आहे.

Web Title: Harshvardhan Patil entry stirs excitement in Indapur Preparations for the third alliance, focus on Pawar's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.