Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:33 PM2024-10-07T13:33:12+5:302024-10-07T13:39:27+5:30
Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
Harshvardhan Patil ( Marathi News ) : राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान,नेत्यांचे पक्षांत्तर सुरू आहेत. आज भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आज इंदापूरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांना अदृश्य मदत केल्याचे पाटील म्हणाले. या विधानानंतर सभेत एकच जल्लोष सुरू झाला.
"खासदार सुप्रियाताई आमच्या भगिनी आहेत, ताई तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही चारवेळा खासदार झाला. तीनवेळा आमचा प्रत्यक्ष थोडाफार सहभाग होता. आणि कालच्या लोकसभा निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता, असं विधान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पाटील हर्षवर्धन म्हणाले, साहेब तुम्ही आग्रह केला, ताई आपलंही बोलणं झालं. जयंतराव तर ज्यावेळी भेटायचे किंवा फोन व्हायचा तेव्हा का थांबलाय तिकडे या इकडे म्हणायचे. पण शेवटी कुठल्याही गोष्टीला योग लागतो. माझी कामाची पद्धत अशी आहे की व्यक्तिगत मी कधी निर्णय घेत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि म्हणाले आता आपल्याला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे. तुम्हीही आम्हाला सन्मानाने प्रवेश दिला, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
इंदापूरात खासदार सुप्रिया सुळेंना मताधिक्य
जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. या निवडणुकी दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महायुतीमध्ये होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती. यामुळे या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवार यांना मदत करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, इंदापूर विधानसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना अधिकची मत मिळाली आहेत.