Sugar Factory Election: कर्मयोगीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:47 PM2021-10-29T17:47:04+5:302021-10-29T17:47:12+5:30
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अलिप्त भूमिका घेतल्याने पाटील यांनी एकहाती सत्ता स्थापन केली
कळस : इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी भरत शहा यांची निवड झाली आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अलिप्त भुमिका घेतल्याने पाटील यांनी एकहाती सत्ता स्थापन केली.
शुक्रवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सभा बोलवण्यात आली होती. यामध्ये पाटील व शहा यांचे अर्ज आल्याने निवड बिनविरोध पार पडली. तालुक्यातील या साखर कारखान्याची गाळप क्षमता मोठी आहे. सहविजनिर्मीती, आसवानी, व इथेनाँल प्रकल्प आहेत. हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या कायम ताब्यात आहे. उपपदार्थ निर्मिती असलेला हा साखर कारखाना माजी खासदार शंकरराव पाटील यांनी वालचंदनगर येथील जुना कारखाना विकत घेऊन बिजवडी येथील माळरानावर ३५ वर्षांपूर्वी सुरू केला. कारखान्याच्या स्थापनेपासून पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. अनेकवेळा निवडणूक झाली कधी काही जागा बिनविरोध झाल्या मात्र सत्ता कायम पाटील घराण्यात राहीली आहे.
यावेळी नूतन संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, शारदा पवार, कांचन कदम, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर उपस्थित होते.