राज्यमंत्री भरणेंच्या १००च्या पावतीला हर्षवर्धन पाटलांच्या चिरंजीवांचे '५००'शेने प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 06:59 PM2020-11-03T18:59:03+5:302020-11-03T19:25:34+5:30
राज्यमंत्र्यांनी शंभर रुपयाच्या दंड भरणे म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाने केला होता..
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका कार्यक्रमात तोंडावरचा मास्क खाली आल्यामुळे स्वयंशिस्तीचा आदर्श वस्तुपाठ घालून देत १०० रुपयांची पावती फाडली होती. सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत लासुर्णे ग्रामपंचायतीत स्वतःहून दंडाची रक्कम जमा केली होती. मात्र राजकारण म्हटलं की 'प्रत्युत्तर' हे ठरलेलेच असते. तोच कित्ता इंदापूरमध्ये पाहायला मिळाला आहे. दत्तात्रय भरणे यांचे राजकीय विरोधक व भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन यांनी कार्यक्रमादरम्यान तोंडावरचा मास्क खाली आल्याचे कारण देत चक्क ५०० रुपयांची पावती फाडली आहे. आता 'ह्या' पावतीची इंदापूरच्या 'राजकीय' जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या काही दिवसांत इंदापूर तालुक्यात सांत्वण भेटीवरुन राजकारण रंगल्याचे अवघ्या तालुक्याने पाहिले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्र्यांनी शंभर रुपयाच्या दंडाची आकारणी भरणे म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाने केला होता. तर जशास तसे उत्तर देण्यासाठी मंगळवार ( दि. ३ नोव्हेंबर ) रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या बावडा या मुळ गावी कार्यक्रमानिमित्त गेलो असता माझाही मास्क घसरल्याचे कारण दाखवत बावडा ग्रामपंचायत कडे पाचशे रुपये दंडात्मक आकारणी रक्कम भरली.
राजवर्धन पाटील म्हणाले की, सामान्य जनता आणि राज्यमंत्री यांच्या दंडासंदर्भात दुजाभाव असल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईतून दिसून आले. याचा अर्थ सामान्य जनता आणि आपण कसे वेगळे आहोत हे दाखवून दिले. विरोधाला विरोध नाही मात्र स्वत: मंत्र्यांनीच कायदा मोडला तर तो कायदा जनतेला कसा काय लागू होतो ? याचे उत्तर प्रशासनाने व कायदा मोडणाऱ्याने द्यावे. मात्र मी जनतेसोबत असून सर्वांना असणारे नियम सारखेच आहेत आणि ते सर्वांनी पाळले पाहिजेत हेच मी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
_____________