पिकं जळाली; विहिरींनी गाठला तळ !
By admin | Published: November 26, 2015 01:00 AM2015-11-26T01:00:45+5:302015-11-26T01:00:45+5:30
पिकं जळाली...विहिरींनी तळ गाठला..चाऱ्याअभावी लाखमोलाच्या किमतीची जनावरं विकायची वेळ आली. उपजीविकेसाठी गावातील माणसं शहरात मजुरीला जायला लागली
बारामती : पिकं जळाली...विहिरींनी तळ गाठला..चाऱ्याअभावी लाखमोलाच्या किमतीची जनावरं विकायची वेळ आली. उपजीविकेसाठी गावातील माणसं शहरात मजुरीला जायला लागली. ही परिस्थिती मराठवाडा किंवा विदर्भातील नसून विकासाचा गवगवा झालेल्या बारामती शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बऱ्हाणपूरची आहे.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. शेती हा मुख्य व्यवसाय असणारे हे गाव बारामतीच्या जिरायती पट्ट्यात येते.
ज्वारी हे रब्बीतील मुख्य पीक; परंतु यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता विहिरींच्या घटलेल्या भूजल पातळीमुळे हक्काच्या
रब्बी हंगामातील ज्वारीही जळून चालली आहे.
चारा पिकांचीही अवस्था
अशीच, त्यामुळे रोजचा चाऱ्यासाठी येथील दूध उत्पादकांना ४०० ते ५०० रुपये खर्च करावा लागत आहे. पेरणीचा खर्चही पिके जळाल्याने वाया गेला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)
दूध व्यवसाय करणे जिकिरीचे ...
सध्या या भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मिळेल तेथून चारा विकत आणत आहे; परंतु चाऱ्याच्या किमतीही दुष्काळामुळे गगनाला भिडल्या आहेत. त्यातच गाईच्या दुधाला १७ ते १८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला २४ ते २५ रुपये दर मिळत आहे. पशुखाद्याच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत दूध व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. अशीच परिस्थीती राहिली तर आमचे गोठे ओस पडतील, अशी व्यथा येथील दूध व्यावसायिकांनी मांडली.