"हसन मुश्रीफ आरोपीला पाठीशी घालतायेत...", आमदार रविंद्र धंगेकरांचा आरोप
By नितीश गोवंडे | Published: January 29, 2024 05:02 PM2024-01-29T17:02:28+5:302024-01-29T17:02:59+5:30
धंगेकर म्हणाले, मी वारंवार ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात जे दाेषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सातत्याने केली....
पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांंनी केलेल्या तपास आणि चौकशीत ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे देखील दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्यावर कारवाई करू देत नसल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी सोमवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केला. तसेच मुश्रीफ डॉ. ठाकूर यांना पाठीशी का घालत आहे, हे देखील समोर आले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी आमदार धंगेकर यांनी केली.
धंगेकर म्हणाले, मी वारंवार ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात जे दाेषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सातत्याने केली. अनेक डाॅक्टर, कर्मचारी, पाेलिस, कारागृहातील पाेलिस यांच्यावर याप्रकरणी कारवाई झाली. परंतु ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी पंचतारांकित सुविधा आराेपी ललित पाटील याला ससून रुग्णालयात दिल्याचे निष्पन्न हाेऊन देखील त्यांच्यावर अद्याप काेणती कारवाई झाली नाही. डाॅ. ठाकूर यांना अटक केल्यावर यामागील भाजपच्या मंत्र्यांचे नाव मी जाहीर करणार आहे. आत्ता नाव सांगितले तर त्याचा तपासावर परिणाम हाेऊन आणखी फाटे याप्रकरणास फुटतील व ठाकूरला माेकळे साेडले जाईल असे मत धंगेकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी, ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करण्यात आली. त्यात आराेपींना अटक देखील करण्यात आली. या प्रकारानंतर डाॅ. ठाकूर यांची भूमिका वेळाेवेळी निष्पन्न झालेली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असून या शहरात अंमली पदार्थाच्या आहारी तरुणाई जाणे चुकीचे आहे. ललित पाटील पसार झाल्या प्रकरणात पुणे पाेलिसांनी न्यायालयात दाेषाराेपपत्र देखील दाखल केले आहे. डाॅ. ठाकूर यांच्यावरील कारवाई बाबत पुणे पाेलिसांनी वैद्यकीय विभागास लेखी पत्र दिले असून त्यात ठाकूर हे दाेषी असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या फाईलवर सही करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुढील कारवाईस पाठवली असल्याची माहिती मला मिळाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत पाठपुरावा घेऊन याेग्य ती कडक कारवाई डाॅ. ठाकूर यांच्यावर करावी अन्यथा नागरिकांचा शासन व व्यवस्थेवरील विश्वास उडेल. अन्यथा मला देखील रस्त्यावर उतरून तीव्र आंदाेेलन करावे लागेल, असेही धंगेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अटक करण्याचे आदेश द्यावे..
विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणातील आराेपीला पाठीशी घालत असतील तर ही बाब चुकीची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, ललित पाटील प्रकरणात डाॅ. ठाकूर यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना द्या. आज पाेलिस खात्यातील अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक तपासणी यंत्रणेची कमतरता यामुळे राज्यभरात अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या टाेळ्या सक्रिय झालेल्या आहेत. अल्पावधीत अधिक पैसे मिळत असल्याने यात काही व्यापारी, पाेलिस, शासकीय अधिकारी गुंतले आहेत. औद्याेगिक क्षेत्रात विविध कारखान्यात राजराेसपणे अंमली पदार्थ माेठ्या प्रमाणात बनवले जात असून ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत डाॅ. ठाकूर यांना अटक न झाल्यास यापुढील काळात मी आणखी तीव्र आंदाेेलन करेल, असा इशारा देखील धंगेकर यांनी दिला.