हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:31 PM2021-10-13T17:31:52+5:302021-10-13T18:23:10+5:30
मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत
पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी बोगस कंपन्या उघडल्या आहेत. निती आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी थेट येणाऱ्या दरवर्षीचा १५०० कोटी रूपयांचाच्या निधीचे कॉन्ट्रॅक्ट परस्पर स्वत:च्या जावायला दिले आहे. दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या नावाने बोगसपणे कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चालाखी चालणार नाही. मुश्रीफ परिवारावर कोल्हापुरातील मुरगुड ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तेथेच कारवाई करा, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष, प्रवक्ते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुणे येथे केली.
पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेऊन यासंदर्भातील आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा चलाखी करत आहेत. ते चालणार नाही. मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत. मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत. तेथूनच कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्याचा दावा करत हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.
वळसे-पाटील यांनी बनवाबनवी कमी करावी
जी कंपनी १० वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्या कंपनीच्या नावे कोट्यवधी रुपये हसन मुश्रीफ यांनी लाटले आहेत. दिलीप वळसे-पाटील यांनी बनवाबनवी कमी करावी. आता मी मुश्रीफांच्या जावयाविरोधात तक्रार दिली आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल, असेही सोमय्या म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पण सरकार शरद पवार चालवतात
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी सरकार चालवणारे राष्ट्रवादीचे शरद पवार हेच आहेत. जर मी काही गुन्हा केला असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. त्यांना कोणी अडवले आहे. त्याचबरोबर राज्यातील कुणीही चुकीची कामे केली असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत आर्थिक फसवणूक प्रकरणाबाबत भेट घेऊन आम्हाला निवेदन दिले आहे. त्याचबरोबर संबधीत इतर कागदपत्रे दिली आहेत. ती कागदपत्रे तपासून त्यावर पुढे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- राजेश बनसोडे, पाेलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, पुणे परिक्षेत्र