अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांचा उतावीळपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:54+5:302021-05-23T04:10:54+5:30
पुणे: इयत्ता दहावीच्या परीक्षेचा वाद न्यायालयात सुरू असताना तसेच राज्य शासनाकडून अकरावी प्रवेशाबाबत कोणतेही आदेश दिलेले नसताना काही महाविद्यालयांनी ...
पुणे: इयत्ता दहावीच्या परीक्षेचा वाद न्यायालयात सुरू असताना तसेच राज्य शासनाकडून अकरावी प्रवेशाबाबत कोणतेही आदेश दिलेले नसताना काही महाविद्यालयांनी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला याबाबत परिपत्रक काढून उतावीळ महाविद्यालयांना ताळ्यावर आणावे लागले आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवू नये, याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अद्याप त्यावर शासनाने अंतिम भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जातात. मात्र, इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. तसेच राज्यशासनाने सुद्धा अकरावी प्रवेश करण्यासंदर्भात परिपत्रक काढले नाही. तरीही काही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबविली जाते हे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना माहित आहे. तरीही अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा उतावीळपणा काही महाविद्यालयांनी दाखविला. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीसाठी महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात तर केली नाही ना? अशी शंका शिक्षण वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
-----------
इयत्ता अकरावी प्रवेश याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशाबाबतचे निर्देश दिले जाणार आहेत. त्यामुळे सध्या कोणीही अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवू नये. विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा गोष्टी करू नयेत, असे परिपत्रक राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्रसिद्ध केले आहे.